मुंबईच्या बेस्ट एसी बसपेक्षाही पुण्याची पीएमपी महागडी  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 07:34 PM2019-07-14T19:34:34+5:302019-07-14T19:36:14+5:30

शहरातील पीएमपीच्या वातानुकूलित बसचा प्रवास साध्या बसच्या तिकीट दरातच होत असला तरी हे दरही मुंबईतील बेस्टच्या दरांपेक्षा अधिक झाले आहेत.

PMPML is more expensive than Mumbai's Best AC Bus | मुंबईच्या बेस्ट एसी बसपेक्षाही पुण्याची पीएमपी महागडी  

मुंबईच्या बेस्ट एसी बसपेक्षाही पुण्याची पीएमपी महागडी  

Next

पुणे : शहरातील पीएमपीच्या वातानुकूलित बसचा प्रवास साध्या बसच्या तिकीट दरातच होत असला तरी हे दरही मुंबईतीलबेस्टच्या दरांपेक्षा अधिक झाले आहेत. पुण्यात पहिल्या २ किलोमीटर अंतरासाठी ५ रुपये मोजावे लागत आहेत. तर बेस्टला पहिल्या पाच किलोमीटरसाठी ५ रुपये द्यावे लागतात. बेस्टच्या एसी बसमधून १५ किलोमीटर प्रवास केला तर केवळ १९ रुपये तिकीट आहे. तर पीएमपीच्या साध्या बसमधून १४ किलोमीटरसाठी २० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत बेस्टपेक्षा पीएमपीचा प्रवास महागडा ठरत आहे.   


मुंबई महापालिकेने नुकतीच बेस्टच्या बससेवेच्या तिकीट दरात जवळपास निम्म्याने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभुमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मार्फत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह लगतच्या भागात सुरू असलेल्या बससेवेच्या तिकीट व पास दराचा आढावा घेण्यात आला. नवीन दरांमुळे पुण्यातील प्रवाशांचा प्रवास बेस्टच्या प्रवासापेक्षा महागडा झाल्याचे दिसून आले आहे. नवीन रचनेनुसार बेस्टने प्रत्येक पाच किलोमीटरचे टप्पे निश्चित करून त्यानुसार पाच रुपयांच्या पटीतच तिकीट दर ठेवले आहेत. पहिल्या पाच किलोमीटरसाठी ५ रुपये तिकीट दर आहे. तर पुढील पाच किलोमीटरसाठी केवळ दहा रुपये मोजावे लागत आहेत. एसी बसचे दरही अत्यंत माफक आहेत. पहिल्या दहा किलोमीटरसाठी केवळ १३ रुपये द्यावे लागतात.  


पीएमपीची सेवा मात्र बेस्टच्या तुलनेत महागडी ठरत आहे. तिकीट दराची रचना प्रति दोन किलोमीटरनुसार पाच रुपयांच्या पटीत आहे. त्यामुळे टप्प्याटप्याने प्रति २, ४ व ६ किलोमीटरच्या अंतराने दर बदलत जातात. साध्या बसचे पहिल्या १० किलोमीटरचे तिकीट दर १५ रुपये असून हे दर मुंबईतील एसी बसपेक्षा २ रुपयांनी अधिक आहेत. पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या एसी ई-बस साठी साध्या बसचाच तिकीट दर ठेवण्यात आला आहे.  पण हा दर बेस्टच्या एसी बसपेक्षा अधिक आहे. एसीपीएमपीने ६० किलोमीटरपर्यंत तिकीट दर निश्चित केले असून त्यासाठी ६० रुपयेच दर आहे. त्यानुसार पुण्यातील जवळच्या अंतराचा प्रवास अधिक महागडा ठरत आहे. तर अंतर जसे वाढत जाईल, त्यानुसार तिकीट दर कमी होत गेला आहे.   

पासच्या दरातही मोठी तफावत
बेस्टचे तिकीट दर कमी झाल्याने पास दरातही मोठी कपात झाली आहे. बेस्टचा साध्या बसचा दैनंदिन पास ५० रुपये तर एसी बसचा ६० रुपये आहे. पण पुण्यात त्यासाठी ७० रुपये मोजावे लागतात. बेस्टचे मासिक पासचे दर २५० ते १ हजार रुपये आहेत. तर पुण्यात हा दर १४०० रुपये एवढा आहे. बेस्टे विद्यार्थी पासचे दरही २०० ते ३५० रुपयांच्या दरम्यान आहेत. पीएमपीचा सर्व मार्गांसाठीचा ७५० रुपयांचा पास आहे. तर मार्गनिहाय पंचिंग पाससाठी तिकीट दरात एका बाजूने ५० टक्के सवलत दिली जाते. म्हणजे एका बाजूने १० रुपये तिकीट असल्यास मासिक पाससाठी ३०० रुपये द्यावे लागतात. अंतर वाढत गेले की पासचा दर वाढत जातो.

Web Title: PMPML is more expensive than Mumbai's Best AC Bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.