PMP चा स्पीड होणार ५० वर लॉक! अतिवेगाने बस चालविणाऱ्या चालकांवर बसणार लगाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 11:16 AM2023-11-01T11:16:01+5:302023-11-01T11:16:21+5:30

अतिवेगाने बस चालविणाऱ्या चालकांवर लगाम बसणार आहे....

PMPML: PMP speed will be locked at 50! Bus drivers driving at high speed will be fined | PMP चा स्पीड होणार ५० वर लॉक! अतिवेगाने बस चालविणाऱ्या चालकांवर बसणार लगाम

PMP चा स्पीड होणार ५० वर लॉक! अतिवेगाने बस चालविणाऱ्या चालकांवर बसणार लगाम

- अविनाश ढगे

पिंपरी :पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) बसचे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने बसची वेग मर्यादा प्रतितास ५० किमीवर लॉक करण्याचे आदेश आगार अभियंता आणि ठेकेदारांना दिले आहेत. यामुळे अतिवेगाने बस चालविणाऱ्या चालकांवर लगाम बसणार आहे.

पीएमपीएमएल बस चालकांचा बेदरकारपणा वाढला असल्याने पीएमपी बस अपघातांमध्ये वाढ झाली आहे. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान ७५ अपघात झाले असून यात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७३ जण जखमी झाले आहेत. बरेच अपघात हे वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. अपघात रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाने आता पीएमपी बसची वेग मर्यादा प्रतितास ५० किमी इतकी लॉक करण्याच्या सुचना आगार अभियंता यांना दिले आहेत. तसेच भाडेतत्वावरील बसेसच्या ठेकेदारांना त्यांच्या बसला वेग मर्यादा लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. बसेसची वेग मर्यादा लॉक केल्यानंतर त्या बसेसचा अहवाल वाहतूक व्यवस्थापक यांना सादर करावा लागणार आहे. बसची वेग मर्यादा लॉक केल्यामुळे नागरिकांचा प्रवास सुरक्षित होणार आहे.

तीन वर्षांतील अपघातांची आकडेवारी-
एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ - ७९ अपघात, १८ मृत्यू , ५२ जखमी
एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ - १३३ अपघात, २२ मृत्यू , १५१ जखमी
एप्रिल ते सप्टेंबर २०२३ - ७५ अपघात, १९ मृत्यू, ७३ जखमी

पीएमपीएमएलचा मुख्य उद्देश नागरिकांचा सुरक्षित प्रवास हे आहे. काही अपघात हे अतिवेगाने बस चालविल्यामुळे झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे सर्वच बसची वेग मर्यादा लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील १५ दिवसात सर्व बसचे स्पीड लॉक केले जातील.

- नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

प्रवाशांच्या सुरक्षितेच्या दुष्टीने हा निर्णय स्वागतार्ह आहे. पण, या निर्णयाची अमंलबजावणी किती दिवस होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

- संजय शितोळे, मानद सचीव, पीएमपी प्रवाशी मंच

 

Web Title: PMPML: PMP speed will be locked at 50! Bus drivers driving at high speed will be fined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.