PMPML | बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यावरील पीएमपी सेवा पूर्ववत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 09:37 AM2022-11-03T09:37:59+5:302022-11-03T09:38:24+5:30
शहराच्या मध्यवर्ती भागात येणाऱ्या नागरिकांना दिलासा....
पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बाजीराव व शिवाजी रस्त्यावरून बंद केलेले सात मार्ग शुक्रवारपासून (दि.४) पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सात मार्गांवर ३१ बसच्या माध्यमातून ३४४ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडीचे कारण देत पीएमपी प्रशासनाने २८ जुलै रोजी शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता मार्गे संचलनात असलेल्या मार्गामध्ये बदल केला होता. बाजीराव रस्ता मार्गे जाणाऱ्या बस दांडेकर पूल, शास्त्री रस्ता, गोपाळकृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्ता मार्गे व शिवाजी रस्त्याने येणाऱ्या बस येताना जंगली महाराज रस्त्याने डेक्कन, टिळक रस्तामार्गे वळवल्या होत्या, तर शिवाजी आणि बाजीराव रस्त्यावर सात मीटर लांबीच्या पुण्यदशम बस सुरू केल्या होत्या. या बस स्वारगेट ते शिवाजीनगरपर्यंतच धावत होत्या. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात येणाऱ्या विद्यार्थांना आणि नागरिकांना दोन बस बदलून ये- जा करावी लागत होती, तसेच तिकिटासाठी अधिक पैसे मोजावे लागत होते.
प्रत्येक दोन मिनिटाला पुण्यदशम बस प्रवाशांना उपलब्ध होईल, असा दावा पीएमपी प्रशासनाने केला होता. मात्र, प्रत्यक्षात प्रवाशांना १५ ते २० मिनिटे बससाठी थांबावे लागत असल्याचे दिसून आले. ही बस स्वारगेट येथूनच भरून येत असल्याने पुढील बसस्टॉपवरील नागरिकांना लोंबकळत प्रवास करावा लागत होता. पीएमपीच्या या निर्णयावर विविध स्तरांतून टीका झाली होती. त्यानंतर पीएमपी प्रशासनाने काही मार्ग पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला होता. तरीदेखील या मार्गावरील प्रवाशांची गर्दी कमी होत नसल्याने पीएमपी प्रशासनाने आधीसारखे सर्व मार्ग सुरू करण्याचा बुधवारी निर्णय घेतला.
पूर्ववत केलेले मार्ग व बसची संख्या
मार्ग बससंख्या बसफेऱ्या
कात्रज ते शिवाजीनगर २ २०
सहकारनगर ते संगमवाडी १ १६
स्वारगेट ते सांगवी ८ १०४
मार्केट यार्ड ते घोटावडे फाटा ७ ५६
नतावाडी ते सहकारनगर २ ४०
अप्पर डेपो ते सुतारदरा १ ८
मार्केट यार्ड ते पिंपरीगाव १० १००
पूर्ववत सात मार्गांवरील बस जाताना बाजीराव रस्त्याने व येताना शिवाजी रस्त्याने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण दिवसभरात बसच्या ३४४ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे आता बाजीराव रस्ता व शिवाजी रस्तामार्गे प्रवास करणाऱ्या प्रवासी नागरिकांची गैरसोय होणार नाही.
-दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थाप