असुविधांच्या गर्तेत अडकलीये पीएमपीएमएल
By admin | Published: March 17, 2017 02:23 AM2017-03-17T02:23:39+5:302017-03-17T02:23:39+5:30
कुठे तुटलेल्या खिडक्या तर काही ठिकाणी तुटलेले सीट्स, उन, वारा पाऊस अश्या कुठल्याच गोष्टींपासून संरक्षण होणार नाही अशीच काहीशी परिस्थीती.
पुणे : कुठे तुटलेल्या खिडक्या तर काही ठिकाणी तुटलेले सीट्स, उन, वारा पाऊस अश्या कुठल्याच गोष्टींपासून संरक्षण होणार नाही अशीच काहीशी परिस्थीती. आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर ज्या ठिकाणी आपत्कालीन खिडकी करण्यात आली आहे, तिथे ती उघडण्यासाठी हँडेल नाही. आणि ज्या ठिकाणी आहे ते योग्य वेळी उघडेल का याची खात्री नाही. अश्या एकंदर परिस्थीतीत पुणेकरांना रोज पीएमपीएमएल ने प्रवास करावा लागत आहे.
शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना पुणेकरांची एकमेव लाईफ लाईन असलेल्या पीएमपीएमएल बसेसची गुरुवारी लोकमत प्रतिनिधींनी पाहणी केली. या पाहणीतून पीएमपीएमएल बस अनेक समस्यांनी ग्रासली असून, प्रवाशांना प्रवास करताना सुरक्षित न वाटणारं असंच काहीच चित्र समोर आले. नव्याने ताफ्यात दाखल झालेल्या बस वगळता जुन्या बसेसमध्ये अनेक त्रृटी आढळून आल्या. लोकमत प्रतिनिधींनी विविध मार्गांवर प्रवास करुन प्रवाशांशी संवाद साधत पाहणी केली.
नियमित बससेवा ,चांगल्या सोयीसुविधा, व चांगल्या बसेस असल्यास बसने प्रवास करण्यास काहीच हरकत नसल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. मेट्रो आणण्याआधीसार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर देण्यात यावा असे मतही अनेकांनी व्यक्त केले.
महापालिका ते वाकडेवाडी पर्यंत केलेल्या प्रवासातील बसेसचे सीट्सही तुटलेल्या अवस्थेत होते. तर महिलांच्या बाजूला उभ्या प्रवाशांना पकडण्यासाठी वरील बाजूस हँडेल नव्हते. बसही जुनीच होती.
एकीकडे पीएमपीएमलची प्रवासी संख्या दिवसेंदिवस घटत असताना अपुऱ्या सोयिसुविधांमुळे व बस मधून प्रवास करताना सुरक्षित वाटत नसल्याने पुणेकर पीएमपीएमएल कडे पाठ फिरवताना दिसत आहेत.
सततचे ब्रेक डाऊन, तुटलेल्या सीट्स, बसेसची झालेली दुरावस्था, बसेसच्या वेळांमध्ये नसलेली नियमितता या सर्वांना नागरिक त्रासले असून बसने प्रवास
करण्याऐवजी स्वत:च्या वाहनाने प्रवास करण्यावर ते भर देत आहेत.