‘पीएमपी’तील दांडीबहाद्दर नरमले; गैरहजेरी घटली, तुकाराम मुंढे यांची कारवाई सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 03:22 PM2018-01-25T15:22:27+5:302018-01-25T15:26:43+5:30
सातत्याने गैरहजर राहणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) तील कर्मचाऱ्यांना कारवाईचा तडाखा बसु लागला आहे. त्यामुळे असे दांडीबहाद्दर नरमले असून गैरहजेरीचे मोठ्या प्रमाणात खाली आले आहे
पुणे : सातत्याने गैरहजर राहणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) तील कर्मचाऱ्यांना कारवाईचा तडाखा बसु लागला आहे. त्यामुळे असे दांडीबहाद्दर नरमले असून गैरहजेरीचे मोठ्या प्रमाणात खाली आले आहे. कारवाईची टांगती तलवार सातत्याने डोक्यावर असल्याने गैरहजेरीप्रमाणेच इतर गैरप्रकारांनाही आळा बसला आहे.
‘पीएमपी’ची निर्मिती झाल्यानंतर मागील दहा वर्षात प्रशासकीय यंत्रणा पुर्णपणे खिळखिळी झाली होती. अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची उघडपणे मनमानी सुरू असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. गैरहजेरीचे प्रमाण वाढले होते. परिणामी, कामात विस्कळीतपणा आल्याने बस सेवेवर विपरीत परिणाम होत होता. तुकाराम मुंढे यांनी ‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर काही महिन्यांतच या बेशिस्तीला आळा बसला आहे. त्यांनी सातत्याने गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची कुंडलीच तयार केली आहे. त्यामध्ये अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मागील काही महिन्यांपासून गैरहजेर राहणाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई केली जात आहे.
दोन आठवड्यांपूर्वी तब्बल १५८ रोजंदारी हंगामी चालकांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून ४५० हून अधिक कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तर कारवाईच्या भीतीने आतापर्यंत १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. मुंढे यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी गैरहजेरीचे प्रमाण ३० टक्क्यांहून अधिक होते. कारवाई सुरू झाल्यानंतर हे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षाही कमी झाले आहे. अनेक कर्मचाऱ्यांकडून वरिष्ठांना कोणतीही पूर्वकल्पना न देत दांड्या मारल्या जात होत्या. त्यामुळे दररोज बस फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण अधिक होते. कारवाईनंतर गैरहजेरीचे प्रमाण घटल्याने मार्गावरील बस फेऱ्यांमध्येही सातत्य वाढल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोणत्याही कर्मचाऱ्यावर हेतुपुरस्सर कारवाई करण्यात आलेली नाही. किंवा यापुढील काळातही ती होणार नाही. नियमांचे उल्लंघन केलेल्या कर्मचाऱ्यांवरच कारवाई होत आहे, असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
शेकडो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
गैरहजेरी तसेच बेशिस्त कर्मचाऱ्यांवरील कारवाई यापुढील काळातही सुरूच राहणार आहे. सुमारे १६० रोंजदारी वाहकांची चौकशी सुरू असून लवकरच त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. काही वरिष्ठ अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून त्यांच्यावरही बडतर्फीची कारवाई होऊ शकते.