पीएमपीची आता जलद बससेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:09 AM2020-12-23T04:09:49+5:302020-12-23T04:09:49+5:30
पुणे : लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवास जलद गतीने होण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने ११ प्रमुख मार्गांवर जलद बससेवा सुरू ...
पुणे : लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवास जलद गतीने होण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने ११ प्रमुख मार्गांवर जलद बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गांवर ई-बस सोडणार असून केवळ ठराविक थांब्यांवरच बस थांबविली जाणार आहे. ही सेवा २५ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली.
पीएमपीकडून लांबपल्ल्याच्या अनेक मार्गांवर बस सोडण्यात येतात. पण अनेक थांबे असल्याने या मार्गांवर शेवटच्या थांब्यापर्यंत पोहण्यासाठी बराच वेळ जातो. तसेच या बसला गर्दीही वाढते. या पार्श्वभुमीवर पीएमपी प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर ११ मार्गांवर जलद बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गांवर काही प्रमुख थांब्यांवर बस थांबविणार आहे. म्हणजे कात्रज ते निगडी या मार्गावर पुर्वी ५९ थांबे होते. आता केवळ १३ मार्गांवरच बस थांबेल. त्यासाठी तिकीट दरात कोणताही बदल केलेला नाही.
जलद बससेवेमुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. अशी सेवा यापुर्वीच मुंबईत बेस्टने सुरू केली आहे. पुण्यामध्ये पहिल्यांदाच ही सेवा सुरू होत आहे. प्रवासी वाढ करण्यासाठीही या सेवेचा फायदा होणार आहे. या मार्गांवर ३० ते ६० मिनिटांदरम्यान प्रवाशांना बस उपलब्ध होऊ शकेल, असे जगताप यांनी सांगितले.
--
जलद बस मार्ग
कात्रज ते निगडी (क्र.४२), भेकराऊनगर ते एनडीए गेट (क्र. ६४ ब), भेकराईनगर ते निगडी (क्र. १३९ अ), भेकराईनगर ते निगडी (क्र. १४९), भेकराईनगर ते आळंदी (क्र. २०१), भेकराईनगर ते चिंचवडगांव (क्र. २०४), भेकराईनगर ते हिंजवडी माण फेज ३ (क्र. २०८), भेकराईनगर ते कात्रज (क्र. ३०१), निगडी ते वाघोली (क्र. ३३६), निगडी ते पुणे स्टेशन (क्र. ३४८), निगडी ते हिंजवडी (क्र. ३७२).