गैरहजेरीच्या कारणास्तव करण्यात आलेल्या कारवाईत पीएमपीचे प्रामाणिक कर्मचारीही घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:47 PM2018-01-31T12:47:14+5:302018-01-31T12:49:35+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) दहमहा २२ दिवसांच्या हजेरीच्या निकषापेक्षा जास्त दिवस हजेरी असूनही काहींवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
पुणे : गैरहजेरीच्या कारणास्तव कारवाई करण्यात आलेल्या चालकांमध्ये काही प्रामाणिक चालकांनाही घरचा रस्ता दाखविण्यात आल्याचे समोर आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) दहमहा २२ दिवसांच्या हजेरीच्या निकषापेक्षा जास्त दिवस हजेरी असूनही काहींवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
‘पीएमपी’ प्रशासनाने काही दिवसांपूर्वी १५८ बदली हंगामी रोजंदारी चालकांवर बडतर्फीची कारवाई केली आहे. सातत्याने गैरहजर राहणाºया कर्मचाºयांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यासाठी प्रशासनाने दरमहा नियमानुसार २२ दिवस हजेरीचा निकष निश्चित केला आहे. त्यानुसार आॅगस्ट ते डिसेंबर २०१७ या चार महिन्यांत त्यापेक्षा कमी दिवस हजेरी असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईमध्ये २२ दिवसांहून अधिक हजेरी असलेल्या चालकांनाही बडतर्फ करण्यात आल्याचे राष्ट्रवादी कामगार युनियनचे सरचिटणीस सुनील नलावडे यांनी सांगितले.
चालकाच्या पगारपत्रानुसार त्याचे आॅगस्ट महिन्यात २३, सप्टेंबर २२, आॅक्टोबर २४, नोव्हेंबर ३०, डिसेंबर २५ असे पगारी दिवस भरले आहेत.
एकही महिन्यात २२ दिवसांपेक्षा कमी हजेरी नाही. त्यामुळे प्रशासनाने केलेली कारवाई चुकीची अशा प्रकारे आणखी काही चालकही भरडले गेले आहेत, असे नलावडे यांनी सांगितले. तसेच सेवानियम ७५(५) मधील तरतुदीनुसार संबंधित सेवकांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना बचावाची संधी देणे आवश्यक आहे. पण १५८ चालकांना ही संधी न देता सेवा संपुष्टात आणली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणीही नलावडे यांनी केली आहे.
स्वारगेट आगारातील एका चालकालाही प्रत्यक्ष कामावर हजर असल्याचे प्रमाण असमानाधानकारक असल्याबद्दल त्याची सेवा संपुष्टात करण्यात आली आहे. आॅगस्ट ते डिसेंबर या कालावधीमधील गैरहजर दिवस २४ व बिनपगारी ४ आहेत तसेच नियमानुसार दरमहा २२ दिवस इतके हजेरीचे दिवस असताना ते कमी असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.