पीएमपीचे देखभाल-दुरूस्तीचे पितळ उघडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 06:30 PM2019-06-14T18:30:40+5:302019-06-14T18:38:27+5:30
पेट्रोलियम कन्झरर्वेशन रिसर्च असोसिएशनच्या टीमने मागील सहा महिने सुमारे १६० बसची देखभाल व प्रशिक्षणाचे काम हाती घेतले होते.
पुणे : देखभाल-दुरूस्ती, चालक, मेकॅनिक प्रशिक्षणानंतर बसची स्थिती सुधारू शकते, यावर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) राबविलेल्या प्रयोगानेच शिक्कामोर्तब केले आहे. पेट्रोलियम कन्झरर्वेशन रिसर्च असोसिएशन (पीसीआरए)च्या टीमने मागील सहा महिने सुमारे १६० बसची देखभाल व प्रशिक्षणाचे काम हाती घेतले होते. त्यामुळे तब्बल २० लाख रुपयांचा इंधनाचा खर्च वाचला आहे. या प्रयोगामुळे पीएमपीचे देखभाल-दुरूस्तीचे पितळ उघडे पडले आहे.
‘पीसीआरए’ ही केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी संस्था आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालय आणि जागतिक बँकच्या सहकार्याने देशात एनर्जी सेक्टर मॅनेटमेंट असिसिटंन्स प्रोग्रॅम (ईएसएमएपी) हा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी जागतिक बँकेने अर्थसहाय्य केले आहे. या कार्यक्रमांतर्गत ‘पीएमपी’ची निवड करण्यात आली आहे. बसची देखभाल-दुरूस्ती, चालक, मेकॅनिक व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण करून इंधन बचत करण्यासाठी ‘पीसीआरए’ अधिकारी मागील सहा महिन्यांपासून पुण्यात आहे. या टीमला मार्केटयार्ड व कात्रज आगारातील अनुक्रमे ७५ व ८५ आगारांची जबाबदारी देण्यात आली होती. या सर्व बस ९ ते १० वर्ष जुन्या होत्या.
मागील सहा महिने त्यांनी या बसची देखभाल-दुरूस्तीवर लक्ष केंद्रीत केले होते. इंधन बचतीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी निवड चालक, मेकॅनिक, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. संबंधित बसची प्रति लिटर धाव वाढल्याने इंधनात बचत होऊ लागली आहे. मागील सहा महिन्यांत मार्केटयार्ड व कात्रज आगारात अनुक्रमे ११ व ९ लाखांचा इंधनाचा खर्च वाचला आहे, अशी माहिती पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी दिली. त्यांच्या प्रयत्नातून हा प्रयोग राबविण्यात येत आहे. पुढील सहा महिने कोथरूड, हडपसर, पुणे स्टेशन, स्वारगेट या चार आगारांमध्येही ही टीम काम करणार आहे.
------------------------
बसच्या देखभाल-दुरूस्तीत ‘पीएमपी’ मागे पडत असल्याचे अधिकाऱ्यांनी अनेकदा मान्य केले आहे. जुन्या बसमुळे देखभाल करण्यात अडचणी येतात, असे त्यांचे म्हणणे असते. पण ‘पीसीआरए’च्या टीमने ९ ते १० वर्ष जुन्या बसची जबाबदारी स्वीकारूनच इंधन बचत केली आहे. या प्रयोगाने ब्रेकडाऊन कमी होण्याबरोबरच मार्गावरील बससंख्याही वाढल्या. त्यामुळे पीएमपीकडून देखभाल-दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
----------------
खबरदारी हीच सुरक्षितता
..........