पीएमपीचे ‘मी कार्ड’ योजना फ्लॉप : दोन वर्षात केवळ २९ हजार कार्डचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 07:00 AM2019-01-01T07:00:00+5:302019-01-01T07:00:06+5:30
२०१७ मध्ये तत्कालीन महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते ‘पीएमपी’च्या स्वारगेट येथील कार्यालयात दोन प्रवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘मी कार्ड’ ही योजना प्रत्यक्षात सुरू करण्यात आली.
-राजानंद मोरे-
पुणे : स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत दोन वर्षांपुर्वी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली ‘मी कार्ड’ योजना फ्लॉप ठरली आहे. दोन वर्षात केवळ २९ हजार ५०० मी कार्डचे वितरण करण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) ला यश आले आहे. दोन्ही महापालिका तसेच पीएमपी प्रशासनाच्या उदासिनतेमुळे ‘पीएमपी’च्या ‘स्मार्ट’ स्वप्नांचे ब्रेकडाऊन होत आहे.
पुणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत अनेक स्मार्ट योजना सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामध्ये ‘मी कार्ड’चाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या योजनांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार दि. २ जानेवारी २०१७ मध्ये तत्कालीन महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते ‘पीएमपी’च्या स्वारगेट येथील कार्यालयात दोन प्रवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘मी कार्ड’ ही योजना प्रत्यक्षात सुरू करण्यात आली. यावेळी कुणाल कुमारही उपस्थित होते. त्यावेळी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्यात सुमारे ३० हजारांहून अधिक पासधारकांना तर दुसऱ्या टप्प्यात इतर प्रवाशांना मी कार्ड देण्याचे ठरविण्यात आले होते.
पीएमपीने दररोज सुमारे १० लाख प्रवासी प्रवास करतात. पण ‘पीएमपी’ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन वर्षात केवळ २९ हजार ५५५ जणांनाच मी कार्ड देण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक ८ हजार कार्ड अंध, अपंग व इतर पासधारकांना देण्यात आले आहे. पीएमपीने दररोज हजारो पासधारक विद्यार्थी आहे. केवळ २१७ विद्यार्थ्यांना मी कार्ड दिले आहे. ‘पीएमपी’मध्ये सुमारे ८ हजार कर्मचाऱ्यांपैकी केवळ ३ हजार कर्मचाऱ्यांजवळ हे कार्ड आहे. तसेच दोन्ही महापालिकेतील केवळ १७६३ कर्मचाऱ्यांना कार्ड वितरण करण्यात आले आहे. इतर प्रवाशांमध्ये केवळ ३०२ प्रवासी कार्डधारक आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, पोलिस, नगरसेवक, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, पुरस्कार विजेते यांच्यांसह इतर प्रवाशांची संख्याही नगण्य आहे. दुबार कार्ड घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
------------
एकुण मी कार्डचे वाटप - २९,५५५
पासधारक - सुमारे ८,२१७
ज्येष्ठ नागरिक - ९५९
प्रवासी - ३०२
पीएमपी कर्मचारी - २, ९५०
पुणे मनपा कर्मचारी - ११९२
पिं.चिं. मनपा कर्मचारी - ५७१
नगरसेवक - १७२
पोलिस - ८७८
इतर - उर्वरित (दुबार, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, निवृत्त कर्मचारी आदी)
------------------
काय आहे मी कार्ड?
स्मार्ट सिटीअंतर्गत एकाच स्मार्ट कार्डच्या माध्यमातून पीएमपी बस, मेट्रो, रेल्वे, टॅक्सी पार्किंग, टोल, खरेदी आदी सुविधा देण्याचे नियोजन होते. या कार्डचे ‘मी कार्ड’ असे नामकरण करण्यात आले आहे. त्यावर प्रवाशाचे नाव, फोटो, जन्मतारीख आहे. या कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा असून सध्या कार्डधारक प्रवाशांना तिकीट काढावे लागत नाही. पीएमपीच्या कोणत्याही पास केंद्रासह संकेतस्थळावर आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर हे कार्ड मिळते. त्यासाठी ११८ रुपये शुल्क भरावे लागते.
..........................
प्रवासीही उदासीन
‘मी कार्ड’बाबत सर्व पास केंद्रांवर जनजागृती केली जाते. पण त्यानंतरही प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा पीएमपी अधिकाऱ्यांनी केला आहे. मी कार्डमुळे प्रवाशांना सातत्याने पास केंद्रावर येणे किंवा वाहकाकडून तिकीट घ्यावे लागत नाही. हे कार्ड वापरासाठी सुरक्षित आहे. हे समजावून सांगितल्यानंतरही प्रवाशांकडून कार्ड घेतले जात नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले.... तर कार्ड बंद होणार
शहरात वर्षभरात मेट्रो धावणार आहे. त्यानुसार महामेट्रोचे ‘कॉमन मोबिलिटी कार्ड’ आणण्याचे नियोजन आहे. हे कार्ड मी कार्डप्रमाणेच असणार आहे. पण महामेट्रोने नवीन कार्ड आणल्यास ‘मी कार्ड’ बंद होण्याची शक्यता आहे. हे कार्ड बंद करून त्याऐवजी महामेट्रोचे कार्ड पीएमपी, मेट्रोसाठी वापरले जाईल, असे सुतोवाच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत यांनी नुकतेच केले.
.................