पीएमपीचे बीआरटी टर्मिनल उपेक्षित

By admin | Published: April 1, 2017 02:26 AM2017-04-01T02:26:11+5:302017-04-01T02:26:11+5:30

पुणे-नगर महामार्गालगत वाघोली येथील केसनंद फाटा चौकामध्ये पीएमपीएमएलच्या बीआरटी टर्मिनलसाठी ग्रामस्थांचा

PMP's MRT Terminal neglected | पीएमपीचे बीआरटी टर्मिनल उपेक्षित

पीएमपीचे बीआरटी टर्मिनल उपेक्षित

Next

वाघोली : पुणे-नगर महामार्गालगत वाघोली येथील केसनंद फाटा चौकामध्ये पीएमपीएमएलच्या बीआरटी टर्मिनलसाठी ग्रामस्थांचा विरोध पत्करून महापालिकेला दोन एकर जागा देण्यात आली असली तरी जागेचा ताबा घेऊन ११ महिन्यांचा कालावधी लोटला असताना पालिकेने अद्यापही टर्मिनलच्या कामास सुरुवात केलेली नाही. पीएमपीएमएलचा कारभार दमदार अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे आल्यामुळे वाघोलीतील बीआरटीचे टर्मिनल उभारण्याकडे लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा वाघोली ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
एक वर्षापूर्वी पुणे-नगर महामार्गावरील बीआरटी मार्ग बांधून तयार होता. मात्र, बसेस थांबणे व प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने टर्मिनल सुरू करण्यासाठी वाघोली येथील दोन एकर जागेची मागणी महापालिकेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. यानंतर वाघोली ग्रामस्थांनी याला विरोध करून रास्ता रोको आंदोलनदेखील केले होते. ग्रामस्थांचा विरोध झुगारून प्रशासनाने केसनंद फाटा चौकातील दोन एकर जागा महापालिकेकडे वर्ग करण्यात आली. यानंतर पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी रावेतच्या धर्तीवर सुसज्ज असे बस टर्मिनल उभारणार असल्याचे जाहीर केले होते. दोन एकर जागेपैकी बस उभ्या करता येतील एवढ्याच जागेचे सपाटीकरण केले गेले. तात्पुरत्या स्वरूपात तीन लोखंडी शेड आणि नियंत्रकाची छोटी खोली उभारून काम सुरू करण्यात आले. या गोष्टीला एक वर्ष पूर्ण होणार असले तरी याव्यतिरिक्त कोणतेही काम महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही. या ठिकाणी सुसज्ज बस थांब्याअभावी प्रवाशांचे होणारे हाल, वाहक-चालकासाठी कोणतीही व्यवस्था अथवा पायाभूत सुविधादेखील नसल्याने टर्मिनल सध्या भकास अवस्थेमध्ये आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी चिखलाची दलदल टर्मिनलच्या जागेमध्ये होत होती. वाघोली ग्रामस्थांनी प्रवाशांची सोय पाहता नंतरच्या काळात नरमाईची भूमिका घेऊन टर्मिनलला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. जागा देऊनही या ठिकाणी टर्मिनल होत नसल्याने वाघोली ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. लवकर टर्मिनल उभारण्याची मागणी करूनदेखील याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. (वार्ताहर)

सुविधेचा अभाव : प्रवासी संख्येत वाढ
वाघोली येथे तात्पुरत्या स्वरूपात बीआरटी टर्मिनल उभारल्यानंतर या ठिकाणाहून पीएमपी पुढे अनेक गावांना जोडली जाईल, अशा बससेवा सुरूकरण्यात आल्या आहेत. यामुळे वाघोली हे परिसरातील गावांचे केंद्रबिंदू झाल्याने प्रवाशांचा ओघ साहजिकच वाढला आहे. टर्मिनलच्या जागेवर प्रवाशांना बसण्यासाठी तीन लोखंडी शेड वगळता मात्र महिला तसेच वृद्ध, शाळकरी मुले यांना कोणतीही शौचालय अथवा पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे.

पीएमपीएमएलचा कारभार धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे आल्याने वाघोली ग्रामस्थांमध्ये सध्यातरी आनंदाचे वातावरण आहे. पीएमपीएमएलच्या रखडलेल्या कामामध्ये वाघोलीतील बस टर्मिनलचे रखडलेले महत्त्वाचे काम तुकाराम मुंढे पूर्ण करतील, अशी माफक अपेक्षा मुंढे यांच्याकडे केली आहे.

Web Title: PMP's MRT Terminal neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.