पीएमपीस हवी २ कोटींची ‘ओवाळणी’
By Admin | Published: August 18, 2016 06:32 AM2016-08-18T06:32:00+5:302016-08-18T06:32:00+5:30
रक्षाबंधनानिमित्त पीएमपीने प्रवास करणाऱ्यांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासनाकडून १०३ जादा गाड्यांची तयारी करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत
पुणे : रक्षाबंधनानिमित्त पीएमपीने प्रवास करणाऱ्यांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासनाकडून १०३ जादा गाड्यांची तयारी करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत रक्षाबंधनाच्या दिवशी पीएमपीला एकाच दिवशी सर्वाधिक उत्पन्न मिळते.
ही बाब लक्षात घेऊन यंदा पीएमपीकडून शहरातील सर्व मार्गांवर तब्बल १७४० गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी प्रशासनाकडून २ कोटी १० लाखांपेक्षा अधिक रुपये उत्पन्नाचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, त्याबाबतच्या सूचना तसेच नियोजनाची माहिती सर्व डेपोप्रमुखांना देण्यात आली आहे. पीएमपीकडून सध्या शहरातील सर्व मार्गांवर १६३७ बसेस सोडण्यात येतात.
रक्षाबंधनाला वाढणारे उत्पन्न लक्षात घेऊन मागील वर्षी १५० जादा बस सोडण्यात आल्या होत्या. त्या वेळी सरासरी १५०० बस मार्गावर असायच्या. त्यातून पीएमपीला एक कोटी ८२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. आज शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी देखरेख ठेवण्यात येणार असून, त्या ठिकाणी अधिकारीही नियुक्त करण्यात येणार आहेत.
बस बंद पडू नयेत, म्हणून त्यांची योग्य प्रकारे देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली. तसेच जास्तीत जास्त बसेस मार्गावर असाव्यात, म्हणून वाहक-चालक यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पीएमपीचे सुमारे २०० अधिकारी व कर्मचारी नियोजनाकरिता मार्गावर थांबणार असल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
सवलतीच्या पासचाही फायदा
पीएमपीकडून या वर्षी पंधरा दिवस देण्यात येणाऱ्या सवलतीच्या पासची योजना रक्षाबंधनाच्या दिवशीही लागू राहणार आहे. त्यामुळे एका दिवसाचा पास ७० ऐवजी ५० रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे या दिवशी या पासची मागणी वाढण्याची शक्यताही असल्याचे वामघारे म्हणाले. त्या अनुषंगाने सर्व तयारी करण्यात आली असून, वाहकांकडे जास्तीत जास्त पास उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.