आरामदायी ड्युटीसाठी पीएमपीचे रेटकार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 04:04 AM2018-10-31T04:04:32+5:302018-10-31T04:12:11+5:30
चालक-आगारप्रमुखांचे साटेलोटे; चांगली बस, फिक्स-लाईट ड्युटीसाठी आर्थिक देवाणघेवाण
पुणे : अनेकदा विशिष्ट पोलीस ठाणी, विभाग, टेबल मिळविण्यासाठी लॉबिंग केले जाते. हाच ट्रेंड पुणे महानगर परिवहन महामंडळामध्येही सुरू आहे. फिक्स ड्युटीपासून चांगली बस मिळण्यापर्यंत हे लॉबिंग केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी काही आगारप्रमुखांनी रेट कार्डच तयार केले आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रार करण्यासाठी कर्मचारी एकत्रित आले असून ७० हून अधिक कर्मचाऱ्यांनी अर्जावर सह्याही केल्या आहेत.
पीएमपीमध्ये एकूण १३ आगारांमार्फत बस संचलनाचे काम चालते. प्रत्येक आगारासाठी प्रमुख असतात. त्यांच्या अंतर्गत बसचे नियोजन, कर्मचाºयांच्या कामाचे नियोजन, बसची देखभाल-दुरुस्ती अशी विविध कामे असतात. काही कामे कमी श्रमाची असतात. हे काम मिळविण्यासाठी काही कर्मचाºयांकडून आगारप्रमुखांकडे वशिलेबाजी लावली जाते. काही आगारप्रमुख त्याला बळी पडत नाहीत. मात्र, काही आगारप्रमुख त्याचा फायदा उचलत कर्मचाºयांकडे पैशांची मागणी करतात. लाईट ड्युटी, फिक्स डुयटी, रजा मंजुरी, वाशिंग सेंटरवर काम, स्टार्टर ड्युटी यासाठी ‘रेट’ निश्चित करण्यात आले आहेत. याबाबत पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडे कर्मचाºयांनी लेखी तक्रार करण्याची तयारी केली आहे.
एका आगार प्रमुखाविरोधात सुमारे ७० हून अधिक कर्मचाºयांनी या तक्रार अर्जावर सह्या करून कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीमध्ये पैशांच्या मागणीचा थेट उल्लेख केला आहे. आगारामध्ये फिक्स ड्युटी हवी असल्यास एक महिन्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली जाते. तीनपेक्षा जास्त रजा घ्यायच्या असतील तर एका रजेला २०० रुपये दर आहे. ‘याबाबत लेखी तक्रार अर्ज घेऊन सोमवारी (दि. २९) गुंडे यांच्याकडे गेलो होतो. मात्र, एका बैठकीमुळे त्या भेटू शकल्या नाहीत. आता बुधवारी त्यांच्याकडे तक्रार केली जाईल,’ असे एका कर्मचाºयाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पैसे द्या, चांगल्या बस घ्या
पीएमपीमध्ये ब्रेकडाऊनचे प्रमाण जास्त आहे. दररोज १५० हून अधिक बस मार्गावरच बंद पडतात. त्यामुळे चालक व वाहकांना त्रास सहन करावा लागतो. परिणामी सुस्थितीतील बस मिळण्यासाठी चालकांकडून आग्रह धरला जातो. त्यासाठी संबंधित अधिकाºयांकडून पैशांची मागणी होते. अनेक चालक निश्चित केलेल्या बससाठीही आग्रही असतात. पण पैसे न दिल्यास ही बस दिली जात नाही. सुस्थितीत नसलेली बस देऊन चालकांना रवाना केले जाते. असे प्रकार काही आगारांमध्ये घडत असल्याचे काही कर्मचाºयांनी सांगितले. त्यावरून चालक व अधिकाºयांमध्येही वादही होतात. काही वेळा हे वाद विकोपाला गेल्याचे पीएमपीतील कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.