‘पीएमपी’ची भाडे वाढ होऊ देणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 09:13 PM2018-10-08T21:13:36+5:302018-10-08T21:13:50+5:30
मागील काही महिन्यांपासून डिझेल व सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पीएमपीचा इंधनावरील दैनंदिन खर्च सुमारे ५० लाखांच्या पुढे गेला आहे.
पुणे : इंधन दरवाढीमुळे तोटा वाढत चालल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाकडून भाडेवाढीवर गांभीर्याने विचार केला जात आहे. मात्र, प्रशासनाकडून भाडेवाढीचा प्रस्ताव आल्यास त्याला विरोध केला जाईल. पुणेकरांना चांगल्या दर्जाची बससेवा देण्याचा प्रयत्न आहे. भाडेवाढीचा विचार नसल्याचे महापौर मुक्ता टिळक आणि पीएमपीचे संचालक व नगरसेवक सिध्दार्थ शिरोळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ‘पीएमपी’ प्रशासनापुढे पेच निर्माण होणार आहे.
मागील काही महिन्यांपासून डिझेल व सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पीएमपीचा इंधनावरील दैनंदिन खर्च सुमारे ५० लाखांच्या पुढे गेला आहे. इंधन दरवाढीमुळे रोजच्या खर्चात सुमारे चार लाखांची भर पडली आहे. दर पंधरा दिवसांनी हा खर्च वाढतच चालला आहे. प्रशासकीय खर्चही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यातच मार्गावर अपेक्षित बस येत नसल्याने तिकीट उत्पन्नावरही परिणाम होत आहे. त्यामुळे खर्च व उत्पन्नाचा मेळ बसविताना नाकीनऊ येत आहे. परिणामी, प्रशासनाकडून तिकीट भाडेवाढीवर गांभीर्याने विचार सुरू असल्याचे ‘पीएमपी’ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात बोलताना शिरोळे म्हणाले, भाडेवाढीचा प्रस्ताव आल्यास त्याला विरोध केला जाईल. पुणेकरांना परवडणारी वाहतुक सेवा मिळायला हवी. पीएमपीचा ५१ टक्के खर्च वेतनावर तर २५ टक्के खर्च बस भाड्यावर होत आहे. इंधनापेक्षा हा खर्च खुप मोठा आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा फारसा परिणाम होत नाही. पण त्यामुळे तोट्यात वाढ होणार असली तरी हा तोटा महापालिका देतच असते. पीएमपी प्रशासनाने बस संचलनाची जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडायला हवी. स्वस्त आणि पर्यावरणपुरक बससेवा देण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. त्यामुळे भाडेवाढ होऊ देणार नाही, असे शिरोळे यांनी स्पष्ट केले.
--------------
कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्याचा विचार नाही. चांगल्या दर्जाच्या बस वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. या बस लवकरच आणल्या जातील. भाडेवाढीला पाठिंबा असणार नाही.
- मुक्ता टिळक, महापौर