पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीची धाव अद्याप गुलदस्त्यातच; अधिकारी प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 06:36 PM2020-07-03T18:36:24+5:302020-07-03T18:41:34+5:30
कोरोना संसगार्मुळे लॉकडाऊन झाल्यानंतर पुणे व पिंपरी चिंचवडमधील बससेवा बंद करण्यात आली...
पुणे : मागील साडे तीन महिन्यांपासून ठप्प असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा पुर्ववत कधी होणार, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. पीएमपी प्रशासनाने मागील महिनाभरापासून ३० मार्गांचे नियोजन केले असले तरी अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. बससेवा सुरू करण्याबाबत काहीही सुचना नाहीत. त्यामुळे अधिकारीही महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.
कोरोना संसगार्मुळे लॉकडाऊन झाल्यानंतर पुणे व पिंपरी चिंचवडमधील बससेवा बंद करण्यात आली. केवळ अत्यावश्यक सेवांसाठीही सुमारे १२५ बस सुरू ठेवण्यात आल्या. तर मागील महिन्यात पेड झोनमधून बाहेर आलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये केवळ ८० बसमार्फत नियमित सेवा सुरू करण्यात आली. मात्र, पुण्यामध्ये अद्यापही बससेवा सुरू करण्याबाबत निर्णय झालेला नाही. शहरात दुचाकी व चारचाकी तसेच रिक्षा वाहतुकीला मान्यता देण्यात आली आहे. पण अनेकांना या वाहनांतून प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यांच्यासाठी बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. पीएमपीचे संचालक शंकर पवार यांनीही कंटेन्मेंट झोन वगळून बससेवा सुरू करण्याची मागणी मागील महिन्यातच केली आहे. पण अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.
-------------
पीएमपी बससेवा सुरू करण्याचा निर्णय कधीही झाला तरी कंटेन्मेंट झोन वगळून अन्यत्र बस सुरू करण्याचे नियोजन आधीपासूनच करण्यात आले आहे. गुरूवारी झालेल्या आगार प्रमुखांच्या बैठकीत त्याचा आढावा घेण्यात आला. प्रामुख्याने गदीर्चे मार्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. पण प्रत्यक्ष बससेवा सुरू कधी होणार हे सांगता येणार नाही. याबाबत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त निर्णय घेतील.
- अनंत वाघमारे, वाहतुक व्यवस्थापक, पीएमपी
-------------
अत्यावश्यक सेवा मार्गावर वाढीव बस
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या मार्गांवर सकाळी व सायंकाळी बसला गर्दी होते. प्रामुख्याने कात्रज-शिवाजीनगर, कात्रज-लोहगाव, हडपसर-पुणे स्टेशन, पुणे स्टेशन-वाघोली, मनपा-निगडी, मनपा-भोसरी, मनपा-आकुर्डी स्टेशन, मनपा-माळवाडी, अप्पर इंदिरानगर-पुणे स्टेशन या मार्गांवर गर्दीनुसार एक-दोन बस वाढविल्या जातील. गर्दीच्यावेळी एक तासाऐवजी अर्धा तासाला बस मिळेल, असे नियोजन सोमवारपासून करण्यात येणार आहे
--------------