शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त ‘पीएमपी’ची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:09 AM2020-12-09T04:09:46+5:302020-12-09T04:09:46+5:30
लोकमत न्युज नेटवर्क पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससेवाचा येत्या १२ डिसेंबरपासून विस्तार केला जाणार आहे. येत्या ...
लोकमत न्युज नेटवर्क
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससेवाचा येत्या १२ डिसेंबरपासून विस्तार केला जाणार आहे. येत्या बारा तारखेला जेजुरी एमआयडीसी, यवत, राहु, सारोळा यासह एकुण १२ नव्या मार्गांचे नियोजन केल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली.
मागील काही वर्षांपासून पीएमपी बससेवा पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सीमा ओलांडून ग्रामीण भागातही सुरु झाली आहे. या सेवेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. आता ही धाव आणखी वाढविली जात आहे. दोन्ही शहरालगत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र विकसित झाले आहे. पर्यटन व तीर्थस्थळे असल्याने बससेवा या भागापर्यंत सुरू करण्याची मागणी होत होती.
संचालक मंडळाने पीएमआरडीए हद्दीपर्यंत सेवा सुरू करण्याची मान्यता दिलेली आहे. त्यानुसार पुर्वी सासवडपर्यंत असलेली सेवा आता जेजुरी एमआयडीसीपर्यंत वाढविण्यात आली आहे. सोलापुर मार्गावरही उरळीपर्यंत असलेली बस यवतपर्यंत धावेल. इतर मार्गांवरही बदल करून त्याचा विस्तार करण्यात आला आहे. एकुण १२ नवीन मार्ग निश्चित करण्यात आले असून त्यासाठी ७० बसचे नियोजन करण्यात आले आहे.
-----------------
दोन महिन्यांपासून नियोजन सुरू होते. मार्गांचे सर्वेक्षण करून थांबे व दर निश्चित करण्यात आले. पुढील तीन महिन्यांसाठी ही प्रायोगिक तत्वावर सेवा सुरू राहील. मिळणाऱ्या प्रतिसादानुसार त्यात बदल केले जातील.
- राजेंद्र जगताप, अध्यक्ष, पीएमपी
-------------------
नव्याने सुरू केलेले मार्ग (कंसात वारंवारिता)
कात्रत ते सारोळा (३० मि.), हडपसर ते यवत (४० मि.), डेक्कन ते भुगाव (२५ मि.), वाघोली ते राहू (१ तास), वाघोली ते रांजणगाव (३० मि.), हडपसर-फुरसूंगी-हडपसर (३० मि.), हडपसर ते घोरपडी (१५ मि.), सासवड ते जजुरी एमआयडीसी (२० मि.), चाकण ते तळेगाव दाभाडे (२० मि.), पिंपरी रोड ते स्पाईन मॉल (३० मि.), पिंपरी रोड ते वारजे माळवाडी (३५ मि.), चाकण ते शिक्रापुर (२० मि.)
-----------