पीएमआरडीच्या मेट्रोला मंत्रिमंडळाकडून मंजुरी? हिंजवडी ते शिवाजीनगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 03:30 AM2018-01-02T03:30:56+5:302018-01-02T03:31:08+5:30
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे पालिकेच्या मेट्रो प्रकल्पापाठोपाठ आता पीएमआरडीएचा मेट्रो प्रकल्पही मार्गी लागेल, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
पीएमआरडीएच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे डिसेंबर महिन्यात अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर राबविला जाणार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी २0 टक्के निधी तर उर्वरित ६0 टक्के निधी खासगी उद्योजकांच्या सहभागातून उभा केला जाईल. केंद्र शासनाच्या ‘न्यू मेट्रो पॉलिसी’नुसार नवीन प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी सादर केला आहे. पीएमआरडीएचा मेट्रो प्रस्ताव ६ हजार ४00 कोटींचा असून, या प्रकल्पासंदर्भातील आवश्यक करार केले जाते, असे पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते यांनी सांगितले. पुणे महानगरपालिकेच्या मेट्रो प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली आहे. शहरातील नियोजित मेट्रो मार्गावर युद्धपातळीवर कामे केली जात आहेत. परिणामी पुणेकरांच्या सेवेसाठी लवकरच मेट्रो दाखल होणार आहे. मात्र, राज्य मंत्रिमंडळाकडून अद्याप पीएमआरडीएच्या मेट्रोस मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे या मेट्रोचे काम केव्हा सुरू होणार याबाबत उत्सुकता होती. परंतु, येत्या मंगळवारी (दि. २) होणाºया मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मेट्रोस मान्यता मिळण्याची शक्यता आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.