अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएचा हातोडा

By admin | Published: June 21, 2017 06:20 AM2017-06-21T06:20:17+5:302017-06-21T06:20:17+5:30

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम तीव्र केली आहे. त्यानुसार अनधिकृत बांधकाम

PMRDA hammer on unauthorized construction | अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएचा हातोडा

अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएचा हातोडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम तीव्र केली आहे. त्यानुसार अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी खेड तालुक्यात मोई येथे मंगळवारी (दि. २०) आठ व्यापारी गाळे व आठ रहिवासी गाळे अशी एकूण ४,५०० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली. या भागातील अनधिकृत बांधकामांना नोटिसाही बजावल्या आहेत.
मोई (ता. खेड) येथील एमआयडीसीजवळील विठ्ठल करपे यांच्या मालकीची जमीन गट नंबर ४६२ येथील ४,५०० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकामावर ही कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईपूर्वी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १६६चे कलम ५३ (१) अन्वये संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र तरीही संबंधित बेकायदा बांधकामे काढून न घेतल्याने मंगळवारी सकाळी साडेआठ ते दुपारी बारादरम्यान जेसीबीच्या साह्याने कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही धडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, तहसीलदार अर्चना यादव, उपअभियंता वसंत नाईक, आळंदी मंडल अधिकारी डी. सी. कारकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या वेळी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज यादव, उपनिरीक्षक महेश मुंडे, श्रीधर जगताप, शंकर कुलकर्णी, पोलीस पाटील नारायण बिडकर, पोलीस कर्मचारी यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की या अनधिकृत बांधकामांना प्राधिकरणाने मार्च २०१७मध्ये नोटीस बजावली होती. सदरच्या बांधकामधारकांनी नोटिसीला काहीही उत्तर दिले नव्हते. त्यामुळे नोटिशीनुसार कारवाईस अंतिम स्वरूप देण्यात आले.
दरम्यान खेड तालुक्यातील अनधिकृत बांधकामांवर प्राधिकरणाने केलेली ही पहिलीच धडक कारवाई आहे. पीएमआरडीएच्या वतीने अशी बांधकामे शोधून संबधित बांधकामांचे पंचनाम्याचे काम प्राधिकरणाच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून करण्यात येत आहे.

Web Title: PMRDA hammer on unauthorized construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.