पीएमआरडीएने पाण्याचे स्रोत निर्माण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 03:29 AM2018-03-30T03:29:38+5:302018-03-30T03:29:38+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये एकूण चाळीस टक्के पाणीगळती होत
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये एकूण चाळीस टक्के पाणीगळती होत असून, ही गळती थांबविल्यास शिल्लक पाणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) देता येईल. मात्र, पीएमआरडीएने पाणीसाठ्यांची क्षमता वाढविण्यासाठी स्व:खर्चाने बृहतआराखडा तयार करावा. तसेच स्वत: पाण्याचे स्रोत निर्माण करावेत, अशी सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी केली. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर बापट यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते.
बापट म्हणाले, की पुणे जिल्ह्यात पीएमआरडीए स्वत:च्या काही पाणीपुरवठा योजना करत असून, अंदाजपत्रकात त्याकरिता निधीची तरतूद केली आहे. जलसंपदा खात्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय होईल.
तलावांमधील गाळ काढणे, बंद जलवाहिनीमधून स्वतंत्र वाहिनी देणे, कालव्यांची दुरुस्ती करणे, धरणाची साठवण क्षमता वाढविणे, अशा माध्यमातून पीएमआरडीएला पाणी देणे शक्य होईल. कोणाचेही पाणी कमी करुन पीएमआरडीएला दिले जाणार नाही. टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम चालू असून हे काम पूर्ण झाल्यानंतर त्यातून हिंजवडीसाठी ०.५ टीएमसी पाणी देण्यात येणार आहे, असे बापट म्हणाले.