मेट्रो शिवाजीनगरहून जाणार हडपसरला, पीएमआरडीएचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 03:52 AM2018-04-04T03:52:22+5:302018-04-04T03:52:22+5:30
शिवाजीनगर ते हडपसर (शेवाळवाडी) मेट्रो मार्गासाठी स्वतंत्र सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहार दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.
पुणे - शिवाजीनगर ते हडपसर (शेवाळवाडी) मेट्रो मार्गासाठी स्वतंत्र सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहार दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते यांनी दिली. तसेच या मार्गासाठी नेमका किती खर्च येणार आहे, याचे दरपत्रक मागवण्यात येत आहे.
शिवाजीनगर ते हडपसर (शेवाळवाडी) मेट्रो मार्गासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश टिळेकर प्रयत्न करत आहेत. पहिल्या टप्प्यात हिंजवडी ते शिवाजीनगर असा २३ किलोमीटर मेट्रोचे काम सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप-पीपीपी) करण्यात येत आहे. हे काम प्रामुख्याने पीएमआरडीए आणि महामेट्रो कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. हाच मार्ग पुढे १२ किलोमीटर म्हणजे शिवाजीनगर ते शेवाळवाडीपर्यंत (जुना जकातनाका) वाढवण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली होती. मागील आठवड्यात यासंदर्भात दिल्ली रेल कॉर्पोरेशन आणि पीएमआरडीएच्या अधिकऱ्यांची संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये ही मागणी मान्य करण्यात आली आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर पहिला टप्प्यातील काम झाल्यावर ही मेट्रो पुढे शिवाजीनगर ते हडपसरपर्यंत नेल्यास रोज शहराच्या वेगवेगळ्या भागात कामानिमित्त प्रवास करणाºया या परिसरातील हजारो नागरिकांचा दळणवळणाचा मोठा प्रश्न सुटणार आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या पहिल्या टप्प्यातील २३ किमीच्या मेट्रोच्या डीपीआरची सुरुवात २०१४-१५ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर २०१६-१७ मध्ये त्याला गती मिळाली. तो वेळ वाचण्यासाठी प्रस्तावित शिवाजीनगर ते हडपसर (शेवाळवाडी) या १२ किमीच्या मेट्रो मार्गिकेचीदेखील उभारणी सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) तत्त्वावर केली जाणार आहे. त्यासाठी डीएमआरसीच्या संचालकांना पत्र पाठवून डीपीआरचे दरपत्रक मागविले आहे. त्यानंतर या मार्गिकेच्या कामाला गती मिळेल.
- किरण गित्ते,
आयुक्त, पुणे महानगर
प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)
मार्गासाठी निधी कमी पडू देणार नाही
पुणे-सोलापूर मार्गावर हडपसर, मुंढवा, वानवडी, फातिमानगर, शेवाळवाडी, मांजरी, कवडी पाठ टोलनाका, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर आणि उरुळीकांचन परिसरात वेगाने नागरीकरण वाढत आहे. या भागातील वाढती लोकसंख्या आणि मिळणाºया पायाभूत सुविधा या अत्यंत तुटपुंज्या आहेत. या परिसरातून रोज हजारो नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात प्रवास करत असतात. त्यामुळे रस्त्यांवर कायम वर्दळ असते. अनेकदा नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना वाहतूककोंडीत तासनतास अडकून पडावे लागत असल्याचे चित्र नित्याचेच झाले आहे. या पार्श्वभूमीवर हिंजवडी ते शिवाजीनगरला येणारा मेट्रोचा मार्ग शिवाजीनगर ते शेवाळवाडीपर्यंत वाढवल्यास मोठा प्रश्न मिटणार आहे. त्यादृष्टीने मागील अनेक दिवसांपासून प्रशासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करत आहे. या मार्गाचा डीपीआर तयार केल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी आणि निधीसाठी पाठपुरावा करणार आहे.
- योगेश टिळेकर,
आमदार, हडपसर विधानसभा मतदारसंघ