तीन ठेकेदारांना पीएमपीचे अभय
By admin | Published: February 21, 2015 01:52 AM2015-02-21T01:52:13+5:302015-02-21T01:52:13+5:30
करारानुसार वेळेत बस न देणाऱ्या तीन ठेकेदारांचा ठेका रद्द करण्याचा पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने संचालक मंडळासमोर ठेवलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला.
पुणे : करारानुसार वेळेत बस न देणाऱ्या तीन ठेकेदारांचा ठेका रद्द करण्याचा पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने संचालक मंडळासमोर ठेवलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला. ठेकेदारांनी भाडेतत्त्वावर पीएमपीला बस देण्यास मंडळाने हिरवा कंदील दाखविला आहे. काही महिन्यांपूर्वी याच कारणास्तव एका ठेकेदाराचा ठेका रद्द करणाऱ्या संचालक मंडळाने या तीन ठेकेदारांबाबत घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पीएमपी संचालक मंडळाची शुक्रवारी सकाळी महापालिकेत बैठक झाली. या बैठकीत तीन ठेकेदारांच्या बस ताफ्यात घेण्यावरून बरीच चर्चा झाली. बस देण्यास मुदतीपेक्षा उशीर केल्याने एका ठेकेदाराचा ठेका संचालक मंडळाने रद्द केला होता. त्याच्याकडील ११० बस संबंधित तीन ठेकेदारांना समान पद्धतीने देण्यात आल्या. त्या वेळी झालेल्या करारानुसार संबंधित ठेकेदारांना सर्व बस पीएमपीच्या सेवेत आणण्यासाठी ठरावीक कालावधी देण्यात आला होता. मात्र, तीनही ठेकेदारांनी मुदतीत एकही बस पीएमपीच्या सेवेत आणली नाही. परिणामी, प्रशासनाने त्यांचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव मंडळासमोर मांडला होता. यावर बैठकीत जोरदार चर्चा झाली. काही सदस्यांनी, ठेका रद्द न करण्याची भूमिका मांडली. अखेर या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. त्यानंतर ५ विरुद्ध २ अशा मतांनी हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.
याविषयी अधिक माहिती देताना पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी म्हणाले, संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय मांडण्यात आला होता. आधीच्या एका ठेकेदाराचा ठेका बस वेळेत न मिळाल्यानेच रद्द करण्यात आला होता. त्याचीच माहिती देत प्रशासनाने आपली बाजू मंडळासमोर मांडली. तीन ठेकेदारांबाबतही तशीच परिस्थिती आहे, असे सांगण्यात आले. मात्र यावर मतदान होऊन प्रस्ताव नाकारण्यात आला. या ठेकेदारांना दंड आकारून बस ताफ्यात घेण्याचा निर्णय बैठकीत झाला. (प्रतिनिधी)
५० मिनीबसेसच्या खरेदीला मान्यता
शहरातील दाट लोकवस्ती व अरुंद रस्ते असलेल्या भागात सोयीस्कर ठरणाऱ्या ५० मिनीबस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंडळाने मान्यता दिली आहे. त्यासाठी पीएमपीने निविदा प्रक्रिया राबविली होती. यात एका खासगी कंपनीने प्रतिबस सर्वात कमी ३७ लाख रुपयांची निविदा भरली होती. त्याला बैठकीत मान्यता दिली. या कंपनीला कामाची आॅर्डरही देण्यात आली. तसेच बीआरटीसाठीच्या इंटिलिजिंट ट्रांझिस्ट मॅनेजमेंट सिस्टिमलाही मान्यता मिळाल्याचे डॉ. श्रीकर परदेशी यांनी सांगितले.