निधीअभावी मोडले ‘पीएमपी’चे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 02:02 AM2018-12-21T02:02:02+5:302018-12-21T02:02:15+5:30

खर्चाचा ताळेबंद जुळेना : वेतन मिळेना वेळेवर, सुट्या भागांअभावी अनेक बस बंद

The PM's swearing-in scheme failed | निधीअभावी मोडले ‘पीएमपी’चे कंबरडे

निधीअभावी मोडले ‘पीएमपी’चे कंबरडे

Next

राजानंद मोरे 
पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससेवेचे पुरेशा निधीअभावी कंबरडे मोडले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तोटा वाढू लागल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न होणे, बससाठी सुटे भाग घेण्यातील अडचणी, देखभाल-दुरुस्तीवर परिणाम अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच पुढील वर्षभरात नवीन वर्षात ई-बस व सीएनजी बस ताफ्यात येणार असल्याने खर्चाचा भार आणखी वाढणार आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह लगतच्या परिसरातील सुमारे दहा लाख प्रवाशांना ‘पीएमपी’मार्फत बससेवा पुरविली जाते. सध्या मालकीच्या १३८४, तर भाडेतत्त्वावरील ६५३ बस अशा एकूण २०३७ बस आहेत. मात्र, विविध कारणांमुळे यापैकी जवळपास पाचशेहून अधिक बस मार्गावर येत नाहीत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने संचलन होत नाही. परिणामी प्रवाशांना बससाठी अनेकदा तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. तसेच अनेक बस जुन्या असल्याने खिळखिळ्या झाल्या आहेत. बे्रकडाऊनचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. या कारणांमुळे प्रवासीसंख्येत अपेक्षित वाढ झालेली नाही. दुसरीकडे दैनंदिन खर्चाचा बोजा वाढतच चालला आहे. सर्वाधिक ५१ टक्के खर्च कर्मचारी व अधिकाºयांच्या वेतनावर होतो. वेतनासाठी दरमहा ३६ कोटींहून अधिक पैसे लागतात. त्यानंतर भाडेतत्त्वावरील बसेसचे भाडे द्यावे लागते. देखभाल-दुरुस्ती, सुट्टे भाग अशा विविध कारणांसाठीही मोठा खर्च होतो. पीएमपीला तिकीट विक्री, पास, जाहिरात, दंडाच्या माध्यमातून एकूण खर्चाच्या केवळ ७५ टक्के उत्पन्न मिळते. तर दोन्ही महापालिकांकडून संचलन तुटीच्या रूपाने २५ टक्के रक्कम मिळते.
पीएमपीला तिकीट व पास विक्रीतून दररोज १ कोटी ३५ लाख ते १ कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. वाढता खर्च आणि अपेक्षित उत्पन्न वाढत नसल्याने मागील वर्षी तब्बल २०४ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. हा तोटा यंदा वाढणार असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे. अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने मागील दोन महिने अधिकारी व कर्मचाºयांचे वेतन वेळेवर देणे शक्य झालेले नाही. सीएनजी गॅसचे सुमारे ३७ कोटी रुपये थकले आहेत.
सुट्टे भाग पुरवठा करणाºया पुरवठादारांचेही लाखो रुपयांचे देणे आहे. त्यामुळे सुटे भाग वेळेवर मिळत नाहीत. परिणामी बस देखभाल-दुरुस्तीवर परिणाम होत आहे.

५० बस मार्गावरच बंद पडतात
निधीअभावी सुटे भाग वेळेवर मिळणे कठीण होत चालले आहे. परिणामी विविध सुटे भाग नसल्याने पीएमपीच्या ७० हून अधिक आगारातच धुळ खात उभ्या असतात. तर देखभाल-दुरूस्तीसाठी ६० हून अधिक बस मार्गावर येत नाहीत.
गुरूवारी चालक नसणे किंवा इतर कारणांमुळे ४२ बस सुस्थितीत असूनही मार्गावर आणता आल्या नाहीत. पीएमपीच्या मालकीच्या एकुण १३८४ पैकी केवळ १०४६ बस गुरूवारी मार्गावर होत्या. त्यातच दररोज ५० हून अधिक बस मार्गावरच बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांना वेळेवर बससेवा देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
 

Web Title: The PM's swearing-in scheme failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे