पीएमपीचा प्रवास होणार ‘कॅशलेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2016 01:15 AM2016-05-20T01:15:31+5:302016-05-20T01:15:31+5:30

१० लाख प्रवाशांसाठी पीएमपी कडून तिकिटांचे सर्व व्यवहार कॅशलेस करण्यासाठी ‘मी’ हे स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

PM's visit to 'cashless' | पीएमपीचा प्रवास होणार ‘कॅशलेस’

पीएमपीचा प्रवास होणार ‘कॅशलेस’

Next


पुणे : पीएमपीने प्रवास करणाऱ्या तब्बल १० लाख प्रवाशांसाठी पीएमपी कडून तिकिटांचे सर्व व्यवहार कॅशलेस करण्यासाठी ‘मी’ हे स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मोबाईलप्रमाणे हे प्रीपेड रिचार्ज कार्ड असणार असून, प्रवाशांना आपल्या आवश्यक तेवढ्या रकमेद्वारे हे कार्ड रिचार्ज करून बसमधून प्रवास करता येणार आहे.
विशेष म्हणजे सर्वसामान्य प्रवाशांसह पासधारकांनाही हेच कार्ड देण्यात येणार असून, येत्या जुलै महिन्यापासून ही नवीन स्मार्ट कार्ड प्रणाली सर्व बसमध्ये लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे पीएमपी प्रवासासाठी निघताना आता प्रत्येक वेळी तिकिटासाठी जवळ
रोख रक्कम बाळगण्याची गरज भासणार नाही. याशिवाय तिकिटांमध्ये वाहकांकडून केल्या जात असलेल्या गैरकारभारालाही आळा बसणार आहे. या स्मार्टकार्डला संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
सुट्या पैशांचे वाद; तिकिटांच्या काळ्या बाजारास आळा
सध्या पीएमपीकडून प्रवाशांना बसमध्ये रोख रक्कम घेऊन तिकीट दिले जाते. अनेकदा दहा आणि पाच रूपयांच्या तिकिटासाठी प्रवाशांकडून पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा दिल्या जातात. त्या वेळी सुट्या पैशांवरून वाद होतात. तर, पीएमपीकडून मासिक, त्रैमासिक, सहामाई तसेच वार्षिक पासधारकांकडून त्यांची कागदपत्रे तपासून एकदाच पास दिला जातो. तर अनेकदा वाहकांकडून तिकिटांमध्ये गैरव्यवहार करून पीएमपीचे आर्थिक नुकसान केले जाते. त्यामुळे या सर्व घटनांना पायबंद घालण्यासाठी ‘मी’ स्मार्ट कार्डचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे.
जुलै अखेरपर्यंत सेवा सुरू
ही सेवा सुरू करण्यासाठी पीएमपीकडून सर्व डेपो आणि सर्व वाहकांना कार्ड वापरण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा उभारावी लागणार आहे. सध्या ही यंत्रणा केवळ निगडी आणि पुणे स्टेशन डेपोमध्ये कार्यान्वीत आहे. पुढील दोन महिन्यांत ही सर्व डेपोंमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रत्येक वाहकासाठी मशिन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानंतर एकाच वेळी संपूर्ण शहरात ही सेवा सुरू केली जाणार आहे.
काय आहे ‘मी’ स्मार्ट कार्ड
पीएमपीकडून प्रवाशांसाठी पासकेंद्र, डेपो, तसेच बसमध्ये वाहकांकडे हे कार्ड उपलब्ध करून देण्यात येईल. हे कार्ड मोफत देण्यात येणार असून, कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीस १०० रूपयांपासून पुढे कितीही रकमे पर्यंत ते या तिन्ही ठिकाणी रिचार्ज करून घेता येईल. एकदा कार्ड रिचार्ज करून घेतल्यानंतर प्रवाशाला बसमध्ये चढल्यानंतर आपल्या प्रवासाचे ठिकाण वाहकाला सांगावे लागेल. त्यानुसार, वाहक त्यांच्याकडे असलेल्या मशिनवर हे कार्ड स्वॅप करेल. या वेळी प्रवाशाच्या कार्डमधून त्याचा तिकिटाची रक्कम आपोआप वजा होईल. तसेच त्याला मशिनवरील त्याचे तिकीटही दिले जाईल. त्यामुळे प्रवाशाला कार्ड रिचार्ज केले असल्यास तिकिटासाठी जवळ पैसे बाळगावे लागणार नाहीत. तसेच सुट्या पैशांवरून वादही होणार नाही.
असे आहे स्मार्ट कार्ड
या ‘मी’ स्मार्ट कार्डसाठी आकाशी निळा रंग निश्चित करण्यात आला असून, कार्ड पुणे शहराचे प्रतीक म्हणून शनिवारवाडा, तर पिंपरी-चिंचवड शहराचे प्रतीक म्हणून छत्रपती शिवाजीमहाराज आणि जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांच्या भेटीचे भक्ती शक्तीचे शिल्प छापण्यात येणार आहे. या शिवाय हे कार्ड प्रवाशांना मोफत देण्यात येणार असून, प्रीपेड रिचार्ज करणाऱ्या प्रवाशांच्या कार्डवर त्यांचे क्रमांक असतील, तर पासधारकांच्या कार्डवर त्यांचे छायाचित्र छापण्यात येणार आहे. हे कार्डही संचालक मंडळाने निश्चित केले आहे.
अशा प्रकारचे स्मार्ट कार्ड देणारी पीएमपी ही देशातील पहिली सार्वजनिक वाहतूक
कंपनी असणार असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी दिली.

Web Title: PM's visit to 'cashless'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.