न्यूमोकोकल लस रोखणार बालमृत्यू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:08 AM2021-07-09T04:08:21+5:302021-07-09T04:08:21+5:30
पुणे : दर वर्षी न्यूमोनियामुळे भारतात अंदाजे ५० हजार नवजात बालके दगावतात. मृत्यूदर रोखण्यासाठी न्यूमोकोकल या स्वदेशी बनावटीच्या लसीचा ...
पुणे : दर वर्षी न्यूमोनियामुळे भारतात अंदाजे ५० हजार नवजात बालके दगावतात. मृत्यूदर रोखण्यासाठी न्यूमोकोकल या स्वदेशी बनावटीच्या लसीचा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी ‘न्यूमोकोकल’ लसीकरण मोहीम राज्यात राबविली जाणार आहे. जिल्ह्यात १२ जुलैपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. पहिला डोस जन्मानंतर सहाव्या आठवड्यात, दुसरा १४ आठवडे आणि तिसरा डोस नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर दिला जाणार आहे.
लहान मुलांमध्ये न्यूमोकॉकस या विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण मोठे आहे. यामुळे नवजात अर्भके मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडतात. जागतिक स्तरावरही पाच वर्षांखालील सर्वाधिक बालकांच्या मृत्यूचे कारण न्यूमोनिया हे आहे. त्यापैकी २० टक्के लहान मुले भारतीय आहेत. न्यूमोकोकल लसीमुळे मृत्यूदर रोखण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट’ ही लस जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे मोफत दिली जाणार आहे. लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्यासाठी ३ कोटी ८६ लाख रुपयांच्या आरोग्यविषय साहित्याची खरेदी केली जाणार आहे.
लसीकरण कार्यक्रमांतर्गत बीसीजी, पोलिओ, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हिपोटायटिस-बी, एच इन्फ्लुएन्झा-बी, रोटा वायरस, गोवर, रुबेला या आजारांवर प्रतिबंधक लस देण्यात येते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार लसीकरण मोहिमेत आता न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन या लसीचा समावेश करण्यात आला आहे. ही लस महागडी असून तिची किंमत ९ हजारांहून अधिक आहे. ती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे मोफत दिली जाणार आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत बालके अधिक बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
----------------
लसीकरण करण्यापूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक होते. त्यानुसार २ जुलै रोजी जिल्हास्तरीय प्रशिक्षण झाले. ६ जुलै रोजी तालुकास्तरावर, तर ७ जुलैला प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- डॉ. सचिन एडके, जिल्हा लसीकरण अधिकारी
----------------
जिल्ह्यातील बालकांचा जन्म-मृत्यू दर
वर्ष जन्म अर्भकमृत्यू बालमृत्यू
२०१७-१८ ५२८२८ १९० ३१७
२०१८-१९ ५७८५५ २७० ३३०
२०१९-२० ७७५०९ २७८ २७७