चीनमध्ये न्यूमोनियाचा उद्रेक, महाराष्ट्रातही फुफ्फुसांना जपा, आरोग्य यंत्रणा अलर्टवर
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: November 29, 2023 05:13 PM2023-11-29T17:13:35+5:302023-11-29T17:13:48+5:30
काेरोनाचा अनुभव पाहता केंद्रीय आराेग्य विभागाकडून भारतात न्युमोनियाबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
पुणे: चीनच्या ईशान्य भागात न्यूमोनियाचा उद्रेक होऊन लीहान मुलांची रुग्णसंख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे. ही साथ म्हणजे इन्फलूएंझा, मायक्राेप्लाझा व काेविडची आहे. या आधी काेरोनाचा अनुभव पाहता केंद्रीय आराेग्य विभागाने भारतात न्युमोनियाबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याआधारे राज्यांनीही उपाययोजना करण्यासंदर्भात हिवताप सहसंचालक डाॅ. प्रतापसिंह सारणीकर यांनी जिल्ह्यातील सर्व जिल्हयांना आदेश दिले आहेत.
या न्यूमोनिया आजाराचे प्रमाण मुख्यत: लहानमुलांमध्ये अधिक दिसते. हा संसर्ग इन्फ्लुएंझा, मायकोप्लाझ्मा न्युमोनिया, आरएसव्ही आणि कोविड मुळे होताना दिसत आहे. चीनमधील या उद्रेकाची भिती आपल्याला नसली तरी या पार्श्र्वभूमीवर आपण आपली आरोग्य व्यवस्था पूर्व तयारी करण्याची आवश्यकता असल्याचे केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक डाॅ. अतुल गाेयल यांनी राज्यांना कळवले आहे. त्या अनुषंगाने राज्याने जिल्ह्यांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना हे आदेश दिले आहेत.
काय आहेत आदेश
- सारी सर्वेक्षण करा
प्रत्येक जिल्हा आणि महापालिकेने आपापल्या क्षेत्रातील श्र्वसनसंस्था आजारांचे सर्वेक्षण गांभीर्यपूर्वक करावे.
- आयएलआय/ सारी संदर्भातील माहिती आयडीएसपी पोर्टलवर अद्ययावत करावी.
- कोविड सर्वेक्षणासाठी 'अॉपरेशनल गाइडलाइन्स फॉर रिवाइज्ड सर्विलन्स इन कंटेक्स्ट अॉफ कोविड - १९' या राष्ट्रीय नियमावलीचा वापर करावा.
- प्रयोगशाळा सर्वेक्षण : आपल्या कार्यक्षेत्रातील निदान प्रयोगशाळांना आयएलआय / सारी रुग्णांचे नमुने नियमितस्वरूपात पाठवण्यात यावेत.
- रुग्णालयीन पूर्वतयारी आपल्या कार्यक्षेत्रातील रुग्णालये या पद्धतीचा उद्रेक हाताळण्यासाठी सुसज्ज ठेवणे गरजेचे आहे. मनुष्यबळ, त्यांचे प्रशिक्षण, अॉक्सिजन उपलब्धता, अॉक्सिजन प्लांट कार्यरत आहेत किंवा कसे, व्हेंटिलेटर उपलब्धता, अतिदक्षता विभागातील सिद्धता, रुग्णालयीन संसर्ग प्रतिबंधक यंत्रणा याबाबत आपण जातीने लक्ष घालून खातर जमा करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.
औषध आणि इतर साधनसामग्री यांचा पुरेसा साठा पहा
यामध्ये आवश्यक औषधांचा पुरेसा साठा, लसी, पीपीई किट, निदानासाठी लागणारे किट, अॉक्सिजन सिलिंडर्स आणि इतर बाबी पुरेशा प्रमाणात आहेत याची शहानिशा करावी. आवश्यक यंत्रसामग्री कार्यरत राहील याची दक्षता घ्यावी. आवश्यक तेथे किरकोळ दुरुस्ती करून घ्यावी. साेबत जनतेचे आरोग्य शिक्षण करावे असेही म्हटले आहे.