रोजगाराच्या बहाण्याने प्रवेश अर्ज फी गोळा करून पोबारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:28+5:302021-07-16T04:08:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जुन्नर : आदिवासी भागातील महिलांना त्यांच्याच घरीच रोजगार उपलब्ध करण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून संस्थेचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जुन्नर : आदिवासी भागातील महिलांना त्यांच्याच घरीच रोजगार उपलब्ध करण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून संस्थेचे सभासद होण्यासाठी प्रवेश अर्जापोटी प्रत्येकी ३०० रुपये गोळा करून संबंधितांनी पोबारा केल्याचा प्रकार अंजनावळे व हडसर येथे झाला आहे.
येथील आर्थिक बचत गटातील महिलांची या प्रकरणात फसवणूक झाली असून रक्कम थोडी असल्याने महिला तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
'आमची' संस्था बेरोजगार महिलांना लघुउद्योग उपलब्ध करणार आहे, असे सांगत एका पुरुषाने आणि दोन महिलांनी बचत गटातील महिलांना संस्थेसंदर्भात माहिती दिली. लघुउद्योगासाठी लागणारा कच्चा माल व साहित्य मोफत देणार आहोत. संस्थेमार्फत अंगणवाडीसाठी लागणाऱ्या खावटीचा पुरवठा केला जातो. गहू, हरभरा अशा धान्यांची पॅकिंगसाठी ५ रुपये संस्थेकडून महिलांना दिले जातील, असे आमिष आदिवासी महिलांना दाखवण्यात आले. तसेच त्यांनी जनसेवा लघु उद्योग विकास (महाराष्ट्र) या संस्थेचे प्रवेशअर्जापोटी प्रत्येकी तीनशे रुपये गोळा केले. लघुउद्योगासाठी लागणारा कच्चा माल आठ दिवसांनी तुम्हाला ाआणून देतो, असे असे सांगत हे संस्थेचे कर्मचारी निघुन गेले. ते अद्यापपर्यंत फिरकले नाहीत. त्यांचा संपर्क होत नाही व ते फोनदेखील उचलत नाहीत. महिलांची आर्थिक फसवणूकप्रकरणी तक्रार दिली असून जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस संस्था तसेच व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नका. ज्यांची फसवणूक झाली आहे त्या महिलांनी जुन्नर पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन आदिवासी कार्यकर्ते दत्ता गवारी यांनी केले आहे.