मनोरंजनाच्या विश्वात आता ‘पॉडकास्ट’ची ‘एन्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:10 AM2021-05-24T04:10:02+5:302021-05-24T04:10:02+5:30
पुणे : लॉकडाऊनच्या काळात सर्व ठप्प झालं. एकमेकांशी मुक्त संवाद, मनमोकळ्या चर्चा, एखाद्या विषयावर अभिव्यक्त होणं यावर मर्यादा आल्या. ...
पुणे : लॉकडाऊनच्या काळात सर्व ठप्प झालं. एकमेकांशी मुक्त संवाद, मनमोकळ्या चर्चा, एखाद्या विषयावर अभिव्यक्त होणं यावर मर्यादा आल्या. पण तंत्रज्ञानाचा वापर करीत अगदी कथा, कादंबऱ्यांचे अभिवाचन असो किंवा विशिष्ट विषयांवर माहिती देणं किंवा रोजच्या जगण्यातील अनुभव असोत याकरिता ‘पॉडकास्ट’ या नवीन माध्यमाचा वापर केला जात आहे. रेडिओ आणि एफएमबरोबरच आता ‘पॉडकास्ट’ श्रवणीय होत आहे.
पॉडकास्टमध्ये फक्त ध्वनीचा (ऑडिओ) वापर करून माहिती दिली जाते. स्वत:च्या आवाजात एखादा विषय विशिष्ट शैलीत रेकॉर्ड करून, त्याला पार्श्वसंगीत देऊन, त्यात संवादाची भर घालत हे पॉडकास्ट तयार केले जात आहेत. ॲपवर पॉडकास्टचे चॅनेल उघडून त्यावर ते अपलोड केले जात आहेत. हे पॉडकास्ट अपलोड झाल्यावर त्याची लिंक सगळीकडे पाठविण्यात येते. सध्या या नवीन माध्यमाची तरुणाईमध्ये क्रेझ निर्माण झाली असून, पॉडकास्ट ऐकणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे.
याविषयी गौरांग कुलकर्णी म्हणाला की, आपण जसा रेडिओ ऐकतो तसेच हे ‘पॉडकास्ट’ असते. फरक फक्त इतकाच आहे की, रेडिओ मध्ये विविध भागांमध्ये विषय मांडले जातात, पण ‘पॉडकास्ट’ आवडीनुसार ठराविक विषयांवर केले जातात. मी पुण्यातली वेगवेगळी ठिकाणं किंवा वास्तू आहेत त्याची माहिती देणारा ‘पॉडकास्ट’ तयार केला होता. त्याचे पाच भाग केले. अजून एका विषयावर लवकरच पॉडकास्ट करणार आहे.
गरवारेची विद्यार्थिनी आणि भरतनाट्यम नृत्यांगना मंजिरी देशपांडे म्हणाली की, मी काही महिन्यांपूर्वी पॉडकास्ट चॅनेल सुरू केले आहे. सध्या मी नृत्यावर आधारित पॉडकास्ट तयार करत असून, त्याद्वारे मी वेगवेगळ्या नृत्यशैलींची माहिती रसिकांसमोर ऑडिओ रुपात मांडत आहे. गदिमांच्या कविता त्यात बसविल्या होत्या. लोकांना हा प्रयोग खूप आवडला. यापुढील काळात भारतातले आर्ट कल्चर, विविध मंदिरातले शिल्प, स्थापत्य यावर देखील पॉडकास्ट करण्याचा विचार आहे. हे नवीन माध्यम करिअरच्या दृष्टीनेही खूप आवश्यक ठरणारे आहे.
---
आजची नवीन पिढी संवेदनशील आहे. परंतु धकाधकीच्या जीवनात वाचनासाठी पुरेसा वेळ दिला जात नाही. पॉडकास्टच्या माध्यमातून 'गदिमां'चे साहित्य तरुण पिढी तसेच मध्यमवयीन लोकांपर्यंत पोहोचविता येईल. त्यादृष्टिकोनातून ‘पॉडकास्ट’ या नवीन माध्यमाचा वापर करीत आहे. 'गदिमां'च्या कथा या मानवी जीवनाच्या विविध रंग दाखविणाऱ्या असून, त्या सर्वांना भावणाऱ्या अशा आहेत. पॉडकास्टच्या माध्यमातून या कथा ऐकणे हा एक सुखकर अनुभव असेल.
- आनंद माडगूळकर, गदिमांचे चिरंजीव
---------------------------------