वर्गात पोपट आणि पिंजरा नेऊन शिकवली कविता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:10 AM2021-02-12T04:10:46+5:302021-02-12T04:10:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कान्हुरमेसाई : इयत्ता १० वीचा वर्ग... शिक्षकांच्या हातात पिंजरा आणि पोपट.. अर्थात मातीचा.. मात्र अभ्यासक्रमात असणारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कान्हुरमेसाई : इयत्ता १० वीचा वर्ग... शिक्षकांच्या हातात पिंजरा आणि पोपट.. अर्थात मातीचा.. मात्र अभ्यासक्रमात असणारी जगदीश खेबुडकर यांची ‘आकाशी झेप घे रे...’ ही कविता शिकवायची त्यासाठी विद्याधाम माध्यमिक व आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील मराठीचे शिक्षक आणि प्राचार्य अनिल शिंदे यांनी पोपट व पिंजरा घेऊन वर्गात प्रवेश केला आणि मुले हरखून गेली.
शैक्षणिक साधनांचा वापर केला तर मुलांना अधिक प्रभावीपणे पाठ्यांश गळी उतरतो आणि तासही रंजक होतो. आता बहुतांश शाळेत वर्ग सुरू झाले आहेत. शिक्षकांनी मरगळ झटकून काम करणे शासनाला अपेक्षित आहे. ऑनलाईन शिक्षणाची ऐशीतैशी झाली असताना तसेच १० वी आणि १२ वीच्या परीक्षाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अध्ययन अध्यापन प्रक्रियेने गती घेतली आहे. कमीत कमी वेळात विद्यार्थ्यांना परिणामकारक व प्रभावीपणे शिकविणे अपेक्षित आहे. शिकविताना शैक्षणिक साधने वापरली तर अध्यापन प्रभावी होते. ही कविता शिकविताना सुधीर फडके यांनी त्यांच्या सुरेल आवाजाला संगीताचाही साज चढविला आहे. म्हणून फलकलेखन झाल्यानंतर मोबाईलचा वापर करून ही कविता मुलांना ऐकविली.
शिक्षकांनी शैक्षणिक साधनांचा वापर केला की वर्गातील वातावरण आज सरांनी वर्गात पिंजरा व पोपट आणल्यामुळे उत्सुकता निर्माण झाली. कवितेचा आशय खूप चांगला समजला. आम्ही सर्वांनी ही कविता ऐकली व स्वतः ती म्हणण्याचा प्रयत्नही केला.
-आदित्य गुलाब गायकवाड, विद्यार्थी
फोटो ओळ : कान्हुर मेसाई येथील विद्याधाम प्रशालेत ‘आकाशी झेप घे रे..' ह्या कवितेचे शैक्षणिक साधनांसह सादरीकरण करताना विषयशिक्षक प्राचार्य अनिल शिंदे.