हृदयस्पर्शी, संवेदनशील प्रतिभेतून साकारलेली कविता समाजमन घडविते : डॉ. अश्विनी धोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:11 AM2021-09-23T04:11:27+5:302021-09-23T04:11:27+5:30

पुणे : ‘कवितेतून लोकांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य कवीकडे असते. वाचकांना विचार करायला लावणारी, अंतर्मनात डोकायला लावणारी कविता ही खरी ...

Poetry created with heart touching, sensitive talent shapes the society: Dr. Ashwini Dhongade | हृदयस्पर्शी, संवेदनशील प्रतिभेतून साकारलेली कविता समाजमन घडविते : डॉ. अश्विनी धोंगडे

हृदयस्पर्शी, संवेदनशील प्रतिभेतून साकारलेली कविता समाजमन घडविते : डॉ. अश्विनी धोंगडे

googlenewsNext

पुणे : ‘कवितेतून लोकांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य कवीकडे असते. वाचकांना विचार करायला लावणारी, अंतर्मनात डोकायला लावणारी कविता ही खरी असते; परंतु महाराष्ट्रात काव्यसंग्रहांना फारसा प्रतिसाद मिळत नाही, ही शोकांतिका असल्याची खंत ज्येष्ठ लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशनच्या वतीने आयोजित ‘बंधुता शब्दक्रांती पुरस्कार’, ‘शब्द उभा रणांगणी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि निमंत्रित कवींचे शब्दक्रांती कविसंमेलन या ‘त्रिवेणी संगम’ विशेष कार्यक्रमात डॉ. धोंगडे बोलत होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक प्रा. डॉ. अशोक कुमार पगारिया, डॉ. विजय ताम्हाणे, अरुण बोराडे, संयोजक संदीप कांबळे, प्रा. प्रशांत रोकडे उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यातील पलूसचे रानकवी नामदेव जाधव यांना डॉ. धोंगडे यांच्या हस्ते ‘बंधुता शब्दक्रांती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. कवी चंद्रकांत वानखेडे यांच्या ‘शब्द उभा रणांगणी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. त्यानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन झाले.

डॉ. धोंगडे म्हणाल्या, ‘समाजाचे दुःख पेलण्याची ताकद कवितेमध्ये असते. प्रत्येक कवितेतून काहीतरी विचार द्यायला हवा. नामदेव जाधव व चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्या संवेदनशील मनातून या कविता साकारल्या आहेत. त्यांना ईश्वराने दिलेली शब्दांची प्रतिभा अफाट आहे.’

नामदेव जाधव यांनी पुरस्कार स्वीकारताना हा सन्मान कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि रानमातीचा असून, या सर्वांना हा पुरस्कार समर्पित करतो, असे सांगितले. डॉ. अशोक कुमार पगारिया, अरुण बोराडे, चंद्रकांत वानखेडे यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. विजय ताम्हाणे यांनी प्रास्ताविक, तर शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप कांबळे यांनी आभार मानले.

फोटो - त्रिवेणी संगम

Web Title: Poetry created with heart touching, sensitive talent shapes the society: Dr. Ashwini Dhongade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.