तहानेच्या अभावामुळे कविता झाली उथळ, नीलिमा गुंडी, अजय कांडर यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 01:41 AM2018-09-28T01:41:22+5:302018-09-28T01:41:45+5:30
कविला सभोवतालचा भोवताल जाणून घ्यायची तहान असावी लागते. या तहानेचा अभाव असल्यामुळेच आजची कविता उथळ झाली आहे. फक्त टाळ्यांसाठी कविता लिहिणे चुकीचे आहे.
पुणे - कवितेत लय येण्यासाठी कवीच्या जगण्यात लय यावी लागते. प्रतिकांचा आणि प्रतिमांचा शोध घ्यावा लागतो. वास्तवाचं आणि समाजाचं भान कविला असलंच पाहिजे. जगणं समृद्ध झालं तरच कविता प्रगल्भ होते. कविता आणि गीत वेगळे नसतात. कविला सभोवतालचा भोवताल जाणून घ्यायची तहान असावी लागते. या तहानेचा अभाव असल्यामुळेच आजची कविता उथळ झाली आहे. फक्त टाळ्यांसाठी कविता लिहिणे चुकीचे आहे. कवितांचा बाजार झालाय असे मत डॉ. नीलिमा गुंडी आणि अजय कांडर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘एक कवी कवयित्री’ कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ कवी उद्धव कानडे आणि प्रमोद आडकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मसापच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थति होत्या.
कवितेच्या निर्मितीप्रक्रियेविषयी भूमिका मांडून कवींनी अनेक दर्जेदार कविता सादर करून प्रेक्षकांची उस्फुर्त दाद मिळवली. विचारलेल्या विविध प्रश्नांना दोन्ही कवींनी दिलेली समर्पक आणि चिंतनशील उत्तरांमुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. गदिमा आणि खेबूडकर हे उत्तम कवीच आहेत. समीक्षकांना ते कवी का वाटत नाहीत? कविता जगण्याला चिकटून आली की ती कसदार होते. कवी व सामान्य माणूस वेगळा नसतो. मनाचा शोध कविला घ्यावा लागतो, कवितेत भेदभाव असू नयेत. कविता मंचावर जास्त आलीपाहिजे. याकडे नीलिमा गुंडी आणि अजय कांडर यांनी लक्ष वेधले.
सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद आडकर यांनी आभार मानले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.
माझा कवितेत ‘वेदनेचा पाऊस’
नीलिमा गुंडी म्हणाल्या, ‘कविता लिहिताना माझ्यातला समीक्षक
कधी आडवा आला नाही. परंतू कविता एखाद्या मासिकाला पाठवताना माज्यातला समीक्षक जागा होत असे त्यामुळे त्या कवितेला
समीक्षेच्या अंगाने पाहूनच ती कविता पाठवत होते. माझ्या कवितेतला आशय निसर्ग आणि स्त्री हा आहे. त्यामुळे ‘पक्षी’, ‘आजचा हॅम्लेट’, ‘अंतर्नाद’, ‘हे ईश्वर’, ‘तळ्यात मळ्यात’, ‘ती’ या कवितांमधून मधून दिसून येतो.
माझ्या कविता या काळानुसार बदलत आलेल्या आहे.
कवीचं जगणं समृद्ध होत जाते तशी कविता समृद्ध होत जाते. सभोताली अनेक घडामोडी घडत असतात कवीने त्याकडे फक्त
सूक्ष्मदृष्टीने पहिले पाहिजे. माज्या कवितांमध्ये समाजातील दु:ख आणि वेदना आलेल्या आहे. त्यामुळे माझा कविता ‘वेदनेचा पाऊस’, ‘तुझ्यासोबत’, ‘सर्वकालीन प्रार्थना’, ‘राष्ट्रवाद’, ‘हत्ती इलो’, ‘आवण ओल’ या मधून तो दिसून आहे. - अजय कांडर