आई अन् निसर्गविषयक काव्याविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:08 AM2021-06-20T04:08:54+5:302021-06-20T04:08:54+5:30
-------------------- प्रत्येकाला आपली आई प्रिय असते. तीच दैवत असते. सध्या नात्याविषयी गोंधळ झालेला असताना रामदास पुजारी यांनी ‘आई-माझं जग’ ...
--------------------
प्रत्येकाला आपली आई प्रिय असते. तीच दैवत असते. सध्या नात्याविषयी गोंधळ झालेला असताना रामदास पुजारी यांनी ‘आई-माझं जग’ हा कवितासंग्रह वाचकांसमेार आणला आहे. पहिल्या भागात आईविषयीच्या १८, दुसऱ्या भागात निसर्गविषयक १८ आणि तिसऱ्या भागात विविध विषयांवरील १९ कविता सादर केल्या आहेत. जन्मदाती आपली आई असते आणि या भूमातेलाही आईच म्हणतो. कारण निसर्गामुळे आपण जिवंत असतो. त्यामुळे या आईलाही जपणे आवश्यक आहे. आईविषयक भावभावनांचे चित्रण कवितांमधून मनाला आनंद देऊन जाते. आईविना काहीच नाही, ‘शक्य असेल तर आई-एकदा तू खरंच ये’ ही कविता आईविषयीचे निस्सीम प्रेम उलगडून दाखवते.
दुसऱ्या भागात निसर्गावरील कविता असून, लेखक स्वत: वनअधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनी निसर्गाविषयी खूप छान वर्णन केले आहे. ‘झाड होता येत नाही, निदान त्याच्यासारखा परोपकार तरी शिकावा’, असे सुंदर विचार त्यांनी मांडले आहेत. ‘उपोषण’ ही कविता तर डोळ्यांत अंजन घालते. झाडे निर्दयपणे तोडणाऱ्या माणसांविरुद्ध उपोषणाला बसतील, याविषयी अतिशय मार्मिकपणे शब्दांतून ओरखडे ओढले आहेत. जगताना आजूबाजूला अनेक घटना घडत असताना त्यावर तिसऱ्या भागातील कविता आधारित आहेत. वास्तववादी आणि मनाला स्पर्श करून जाणाऱ्या या कविता अतिशय छान आहेत.
कवितासंग्रह - ‘आई-माझं जग’,
लेखक - रामदास पुजारी, प्रकाशक वेदान्तश्री