फर्ग्युसनमध्ये रंगली काव्यमैफिल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 08:29 PM2019-01-05T20:29:05+5:302019-01-05T20:30:16+5:30
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील किमया या ठिकाणी कविता आणि काव्य मैफिलीचे आयाेजन करण्यात आले हाेते.
पुणे : सजवलेला रंगमंच, समाेर महाविद्यालयीन तरुणाई आणि काळजाचा ठाव घेणाऱ्या कवितांचं सादरीकरण. फर्ग्युसन महाविद्यालयातील किमया हा कट्टा शनिवारी काव्यमैफलीत रंगून गेला हाेता. निमित्त हाेते फर्ग्युसनच्या मुक्तछंद तर्फे आयाेजित कविता आणि बरंच काही या कार्यक्रमाचे.
दरवर्षी फर्ग्युसन महाविद्यालयात मुक्तछंद या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात येते. या कार्यक्रमाअंतर्गत विविध गुणदर्शनाची संधी विद्यार्थ्यांना देण्यात येते. सध्या पुण्यातील बहुतांश महाविद्यालयांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि इतर कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयातील किमया ही जागा कलाकारांसाठी एक हक्काचे व्यासपीठ आहे. या ठिकाणी नेहमीच विविध विषयांवरील कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात येते. त्यात मग पथनाट्य असाे की कथाकथन. किंवा राॅक संगीताचा एखादा कार्यक्रम असाे. फर्ग्युसनमधील विद्यार्थ्यांच्या मनात किमयाचे एक वेगळे स्थान आहे. याच किमयामध्ये मुक्तछंत अंतर्गत कविता आणि बरंच काही या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.
सजवलेला रंगमंच, बैठकीसाठी केलेली व्यवस्था आणि समाेर कविता आणि संगीताचा आनंद घेण्यासाठी जमलेले प्रेक्षक. या प्रेक्षकांमध्ये जवळजवळ सर्वच तरुण तरुणी. एकामागून एक कवीता आणि गाणी सादर हाेतात आणि मैफिलीत रंग भरत जातात. प्रेमाच्या कवितांमधून प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण हाेते. या कवितांना क्या बात है आणि वाह ने दाद देण्यात येत हाेती. कविता आणि बरंच काही या कार्यक्रमात पुण्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. यात प्रणव आपटे, तुषार जाधव, ऋत्विक आपटे, विराज कवी, बाळकृष्ण तंबाेजकर, मानस गाेडबाेले, ऋतुराज हिंगे, चिन्मय आपटे, प्रथमेश रानडे, प्रणव केसकर, चारुता हिंगे या विद्यार्थी कलाकारांचा समावेश हाेता.