काव्य म्हणजे कवीच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब : अश्विनी धोंगडे; पुण्यात पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:55 PM2018-02-21T12:55:01+5:302018-02-21T12:58:54+5:30
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित कवीच्या काव्यसंग्रहाला सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कार दिला जातो. यंदा धोंगडे यांच्या हस्ते कवी माधव हुंडेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे : कवी जगत असताना त्याच्या जगण्यातून जे विचार, भावना व्यक्त होत असतात त्या तो कवितेमधून सादर करतो. कवी जोपर्यंत त्याचे स्वत:चे सत्त्व कवितेत मांडत नाही, तोपर्यंत त्याची कविता पूर्ण होत नाही. कवितेमध्ये त्या कवीचे समग्र व्यक्तिमत्त्वच प्रतिबिंबित होत असते. कविता म्हणजे त्या कवीचे शब्दांतून समोर आलेले जणू काही एक रूपच असते, असे मत साहित्यिका अश्विनी धोंगडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित कवीच्या काव्यसंग्रहाला सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कार दिला जातो. यंदा धोंगडे यांच्या हस्ते कवी माधव हुंडेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माधव हुंडेकर यांच्या ‘दायभाग’ कवितासंग्रहाची निवड करण्यात आली. या वेळी कविता निवड समितीच्या सदस्या डॉ. वर्षा तोडमल, मीरा शिंदे, सुहासिनी यांच्या कन्या डॉ. रूपा आडगावकार, डॉ. अलका चिडगोपकर, मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे, बण्डा जोशी आदी उपस्थित होते.
धोंगडे म्हणाल्या, ‘‘जो कवी असतो, त्याच्यावर समाजातील घटना व घडामोडींचा परिणाम होत असतो. या घटना त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होतो आणि तो भाग कविता म्हणून बाहेर पडतो. त्या कवितेमध्ये वैचारिक व बौद्धिकता जाणवते. त्यामुळे प्रत्येक कवीने समाजात घडणाºया घटनांचा जाणीवपूर्वक विचार करावा.’’
माधव हुंडेकर म्हणाले, ‘‘मी ज्या भावनेतून कविता लिहिल्या, त्या जनांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी ठरलो. मला अनेकांनी विचारले, की तुम्ही कविता कधी लिहिता? तर मी कविता लिहीत नाही ती एखादा आशय आणि आकृतिबंध घेऊन येते. आपल्याला आलेले अनुभव ही कवितेच्या बाबतीत श्रीमंती असते. म्हणून माझी कुठली कविता वादाला जाऊन चिकटत नाही.’’
वर्षा तोडमल म्हणाल्या, ‘‘दायभाग ही कविता संग्रहाच्या रूपात सागळ्यांसमोर आली आहे. हे वेगळेपण आहे. कविता हा प्राचीन प्रकार आहे. त्यातून कुठलीही भावना व्यक्त करता येते.’’
या संग्रहाची कुठलीही कविता वाचताना त्यातून कमी शब्दांचा वापर आणि उत्तम आशय दिसून येतो. तसेच कवितेमधून स्वत:चा स्वर जाणण्याची वृत्ती दिसून येते. प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. बण्डा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले.