कवितेमुळे ‘सेल्फी’ची झाली पोलखोल
By admin | Published: January 25, 2017 02:26 AM2017-01-25T02:26:21+5:302017-01-25T02:26:21+5:30
बायकोने मंत्र्यांबरोबर बेडरूममध्ये सेल्फी ‘क्लिक’ केला... अंबाडा आणि पदर ठीक केला आणि लाडालाडात पुटपुटली... घरी असाल तेव्हा ‘सेल्फी’ काढणार आहे... घरची ‘हजेरी’ भरणार आहे.
पुणे : बायकोने मंत्र्यांबरोबर बेडरूममध्ये सेल्फी ‘क्लिक’ केला... अंबाडा आणि पदर ठीक केला आणि लाडालाडात पुटपुटली... घरी असाल तेव्हा ‘सेल्फी’ काढणार आहे... घरची ‘हजेरी’ भरणार आहे.
निमित्त होते, युवासेना आणि संवाद पुणे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याचे. प्रसिद्ध कवी संदीप खरे आणि सुधीर मुळीक यांना ‘मार्मिक कवी पुरस्कार’ फुटाणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यानिमित्त रंगलेल्या कविसंमेलनात फुटाणे
यांनी ‘सेल्फी’ निर्णयाची पोल खोलली.
शिक्षणमंत्र्याचा ‘सेल्फी’ जसा गाजला, तशी ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांची ही कविताही ‘कविसंमेलनात’ भलतीच गाजली... समाज कुठे चालला आहे आणि आपले मंत्री सेल्फीसारख्या कल्पना राबवून राज्याला भलतीकडेच घेऊन जात आहेत, अशा विसंगतीतूनच कविता सुचते. सर्वसामान्य माणसाला पडणारे प्रश्न आणि दु:ख कवितेत दिसले, की ती कविता जवळची वाटते, अशा शब्दांत फुटाणे यांनी कवितेमागची प्रेरणा उलगडली.
माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, युवासेनेचे शहराध्यक्ष किरण साळी, सुनील महाजन, निकिता मोघे उपस्थित होते. कविसंमेलनात रामदास फुटाणे, संदीप खरे, कल्पना दुधाळ, सुधीर मुळीक, तुकाराम धांडे यांनी विविध ढंगांत कविता सादर करून सर्वांचीच मने जिंकली. संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)