लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रियकरानेच कालवले संसारात विष; अखेर सर्वांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 01:47 PM2022-04-10T13:47:27+5:302022-04-10T14:14:02+5:30
लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रियकराच्या आणि मध्य प्रदेशात राहणाऱ्या पती, सासू-सासऱ्यांच्या त्रासाला कंटाळून एका उच्चशिक्षित विवाहित महिलेने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली
पुणे : लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रियकराच्या आणि मध्य प्रदेशात राहणाऱ्या पती, सासू-सासऱ्यांच्या त्रासाला कंटाळून एका उच्चशिक्षित विवाहित महिलेने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. खराडी येथील इन यांग सोसायटीत 5 एप्रिल रोजी हा प्रकार घडला.
मानसी भूपेंद्र यादव (वय 27) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती भूपेंद्र मुलायमसिंग यादव (वय 30), मुलायम सिंग यादव (वय 52) राजकुमारी मुलायमसिंग यादव (वय 50) यांच्यासह प्रियकर शिरीष नरेंद्र शहा (वय 33) याच्याविरोधात चंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत महिलेचे वडील संदीप फुलसिंग यादव (वय 50, रा. मध्य प्रदेश) यांनी तक्रार दिली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी यादव या मुलीचे भूपेंद्र यादव याच्यासोबत लग्न झाले होते. पती सासू सासरे हे सर्व मध्यप्रदेशात राहतात. तर मानसी यादव या उच्च शिक्षणासाठी पुण्यात आल्या होत्या. खराडीतील ईन यांग सोसायटीत त्या राहत होत्या. इथे आल्यानंतर त्यांची रियल इस्टेट एजंट असलेल्या शिरीष शहा याच्यासोबत ओळख झाली होती. त्याच्या सोबतच ती लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होती.
दरम्यान मागील काही दिवसांपासून पती आणि सासू सासरे तिच्याकडे घटस्फोटाची मागणी करत होते. तर आरोपी शिरीष हा ती विवाहित असल्याचे माहीत असतानाही माझ्यासोबत लग्न कर असा तगादा लावत होता. तसेच तिच्याकडे पैशाची मागणी करत होता. या सर्व त्रासाला कंटाळून मानसी यादव हिने 5 एप्रिल रोजी नदीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही लोकांनी तिला नदीतून बाहेर काढले आणि घरी आणून सोडले होते. त्या दिवशी तिने रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घराच्या दहाव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली. चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर सोनवणे अधिक तपास करत आहेत.