"रासायनिक शेतीमधून पोटात जातेय विष..." ‘दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदे’ला पुण्यात सुरुवात
By श्रीकिशन काळे | Published: March 1, 2024 02:56 PM2024-03-01T14:56:38+5:302024-03-01T14:57:55+5:30
आपण भविष्य घडविण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो, असे पर्यावरण अभ्यासक डॉ. वंदना शिवा यांनी सांगितले....
पुणे : 'पर्यावरण संवर्धनात महिलांनी योगदान देण्याची गरज आहे. रिजनरेशनची ताकद पृथ्वी आणि महिलांमध्ये आहे. अन्नाद्वारे आपण पृथ्वीशी जोडले जातो. अन्नातून रासायनिक शेतीचे विष पोटात जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी एकत्रित येवून काम करण्याचा संदेश देणाऱ्या या परिषदेची गरज आहे. आपण भविष्य घडविण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो, असे पर्यावरण अभ्यासक डॉ. वंदना शिवा यांनी सांगितले.
'इंडियन फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन' आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शनिवारी (दि.१) पुण्यात झाले. 'वर्किंग टुगेदर फॉर सस्टेनेबल फ्युचर' ही या परिषदेची संकल्पना आहे. मुंबईच्या एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. या वेळी 'इंडियन फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन' च्या अध्यक्ष डॉ. रंजना बॅनर्जी, उद्योजक मेहेर पदमजी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
याप्रसंगी भारत, नेपाळ, भूतान, मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान या देशातील प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत. 'युनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन-आशिया' च्या उपाध्यक्ष डॉ. मीरा बोन्द्रे, 'युनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन, पुणे 'च्या अध्यक्ष डॉ. उज्वला शिंदे, सचिव कल्याणी बोन्द्रे, खजिनदार ॲड. प्रेमा कुलकर्णी, असोसिएट रिप्रेझेंटेटिव्ह नीलम जगदाळे, अबेदा इनामदार आदी उपस्थित होते. कल्याणी बोंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. शिवा म्हणाल्या,‘‘ पृथ्वीवर जैवविविधता प्रचंड आहे, ती जपली पाहिजे. अल्झायमर, ऑटीझमपासून विविध विकार हे पर्यावरण न जपल्याने होत आहेत. खते आणि कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. प्रत्येक सूक्ष्म जीवाला बुद्धी असते. सूर्याकडून ऊर्जा मिळते. प्रकाश संश्लेषणाने वनस्पतीला आणि त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. म्हणून निसर्ग मृत होऊ देता कामा नये. पूर्वी जमीन खासगी नव्हती, सर्वांची होती. अहिंसक शेतीची गरज आहे. त्यात किडे, मुंग्यांना, जीवजंतूंना स्थान असले पाहिजे. सेंद्रिय शेती ही अहिंसक शेती आहे. एकूण शेतीमध्ये सेंद्रीय शेतीचे प्रमाण चांगले असेल, तर निसर्ग शाबूत राहील. शेतकऱ्याविना शेती, शेतकऱ्याविना अन्न या चुकीच्या कल्पना आहेत.'एंट्रोपी' जपली तर प्रदूषण,क्लायमेट चेंजवर मात करता येईल'.
मेहेर पदमजी म्हणाल्या,'क्लीन एनर्जी, क्लीन एअर, क्लीन वॉटर साठी उद्योगांनी पुढे आले पाहिजे. चांगल्या भवितव्यासाठी ते उपयुक्त ठरेल.भारतात गवत, पिकांचा उरलेला भाग पेटवून देणे घातक आहे. त्यातून ऊर्जा, निर्मिती केली पाहिजे.इंधन उद्योगानी सांडपाण्यावर प्रक्रिया केली पाहिजे.शाश्वततेसाठी कार्यरत नसलेल्या समाजात उद्योग जगू शकणार नाहीत'. अख्तर खातून यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला.