पोखरी घाटही धोकादायक, अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 01:10 AM2018-08-05T01:10:59+5:302018-08-05T01:11:01+5:30

सुरक्षेची काळजी न घेतल्याने दापोली येथे भीषण अपघाताची घटना घडली. येऊ घातलेल्या भीमाशंकर यात्रेच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील पोखरी घाटाची पाहणी केली असता हा घाटही धोकादायक ठरू शकतो, असे चित्र आहे.

Pokhari Ghat is also dangerous, Invitation to Accident | पोखरी घाटही धोकादायक, अपघाताला निमंत्रण

पोखरी घाटही धोकादायक, अपघाताला निमंत्रण

googlenewsNext

डिंभे : सुरक्षेची काळजी न घेतल्याने दापोली येथे भीषण अपघाताची घटना घडली. येऊ घातलेल्या भीमाशंकर यात्रेच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील पोखरी घाटाची पाहणी केली असता हा घाटही धोकादायक ठरू शकतो, असे चित्र आहे. पोखरी घाटातील अवघड वळणे व तीव्र उतार असून संरक्षक भिंतीची गरज आहे. अरुंद रस्ता व दिवसेंदिवस घाटातून वाढू लागलेली वाहतुकीची वर्दळ यामुळे हा घाटरस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे. परंतु, याकडे सातत्याने दुर्लक्षच होत आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाट. श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाण्यासाठी मंचर-भीमाशंकर एकमेव मार्ग आहे. या रस्त्यावर डिंभे गावच्या पुढे जवळपास १० किलोमीटरवर घाट सुरू होतो. या संपूर्ण घाटात सात अवघड वळणे लागत असल्याने ‘सातमाळी’ घाट म्हणूनही त्याची ओळख आहे. या घाटातील वळणांवर अनेक ठिकाणी रस्त्याच्या वरच्या बाजू कमकुवत झाल्या आहेत. अनेकदा या घाटात पावसाळ्यामध्ये दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळा, श्रावण महिना, महाशिवरात्री, कोजागरी पौर्णिमा, दिवाळी व उन्हाळी सुट्यांच्या दरम्यानही या रस्त्यावर सतत वाहतुकीची वर्दळ असते.
सुमारे ३५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात विशेष अशी सुधारणा झालेली नाही. अवघड वळणांवरील तीव्र उतार सध्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहेत. या घाटात अनेकदा छोटे-मोठे अपघात घडत असतात. अरुंद रस्त्यामुळे एसटी बस, लक्झरी बस यासारख्या मोठ्या वाहनांमुळे या घाटात अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होत आहे.
घाटातील कमलजामाता मंदिराजवळ असणाऱ्या वळणावर एसटी बस व वारकºयांचा ट्रक उलटून मोठे अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. गोहे गावापासून माथ्यावरील राजेवाडी गावापर्यंत घाटास संरक्षक भिंत बांधण्याची अनेकदा मागणी करण्यात आली आहे. मात्र, याकडे आजपर्यंत दुर्लक्षच होत आहे. भीमाशंकर विकास आराखड्याप्रमाणेच या घाटातील रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र, कामाला अद्यापही सुरुवात झाली नाही. या घाटातील धरण पॉर्इंटपासून पुढे अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
>ज्योतिर्लिंगांना जोडणारे रस्ते १० मीटरपर्यंत रूंद करून नॅशनल हायवे अंतर्गत घाट रस्त्याच्या कामास परवानगी मिळणार होती. मात्र अद्याप बांधकाम विभागाकडे कोणतीही परवानगी मिळाली नाही. सध्या घाटातील खड्डे भरणे, गटारे साफ करण आदी कामे बांधकाम विभागाकडून केली आहेत. रस्त्यावर बेअरींग उभी करणे खालच्या बाजूने वॉल कंपाऊंड बांधणे इत्यादी कामे करावी लागणार आहेत. दर तीन वर्षांनी घाट तस्त्याचे डांबरीकरण होणे गरजचे आहे. मात्र या घाट रस्त्यावर मोठ्या स्वरूपाची कामे होण्यासाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे.
- एल. टी. डाके, उप अभियंता बांधकाम विभाग (घोडेगाव)


पोखरी घाटाच्या रुंदीकरणासह या घाटास संरक्षक भिंत बांधणे, अवघड वळणांवरील उतार कमी करण्यासाठी वारंवार शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. भीमाशंकरमुळे या रस्त्यावर सतत वर्दळ असते. मोठी वाहने पार होताना नेहमीच अडथळे निर्माण होतात. अनेकदा अपघातही झाले आहेत. एक-दोनदा भाविकांच्या लक्झरी बसचे गंंभीर अपघात होता-होता वाचले आहेत. या घाटरस्त्याला संरक्षक भिंत होणे अतिशय गरजेचे आहे.
- मारुती भवारी
पुणे जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा

Web Title: Pokhari Ghat is also dangerous, Invitation to Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.