पोलिसांनी वेळमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या A. R. Rahman ला तोंडावर सुनावले, स्टेजवर जाऊन शो बंद पाडला...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 12:27 PM2023-05-01T12:27:05+5:302023-05-01T12:27:48+5:30
पुण्यातील ज्या परिसरात अनेक हॉस्पिटल आहेत त्याठिकाणी या कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशी असा प्रश्न आता विचारला जात आहे
पुणे/किरण शिंदे: प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांचा शो पुणेपोलिसांनी मध्येच बंद पाडला आहे. रात्री 10 वाजल्यानंतरही ए आर रहमान यांचे गाणे सुरूच होते. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी स्टेजवर जाऊन ए आर रहमान यांना गाणं बंद पाडण्यास भाग पाडले. इतकच नाही तर दहा वाजल्यानंतरही तुम्ही कसे जाऊ शकता असे म्हणत ए आर रहमान यांना तोंडावरच सुनावले.
पुण्यातील राजाबहादुर मिल परिसरात रविवारी रात्री या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी हजेरी लावली. इतकेच नाही तर पुणे पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारीही कुटुंबीयांसह या कार्यक्रमाला हजर होते. परंतु दहा वाजल्यानंतरही कार्यक्रम सुरूच ठेवल्याने चक्क स्टेजवर जाऊन पुणे पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर ए आर रहमान स्टेजच्या पाठीमागे निघून गेले. दरम्यान पुणे शहरात झालेल्या या कार्यक्रमानंतर पुणे पोलिसांवर पुन्हा एकदा टिकेची झोड उठवली जाऊ लागली. राजा बहादुर मिल परिसरात अनेक हॉस्पिटल आहेत, हा परिसर सायलेंट झोन असतानाही पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशी असा प्रश्न आता विचारला जात आहे. या कार्यक्रमामुळे पुणे स्टेशन आणि परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती, अनेकांना मनस्ताप झाला. त्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी देणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.