४५१ बिटकॉईन हस्तगत करण्यात पोलिसांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 02:11 AM2018-12-20T02:11:36+5:302018-12-20T02:11:57+5:30
बिटकॉईन प्रकरण : १० आरोपींवर पुरवणी दोषारोपपत्र दाखल
पुणे : बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवून हजारो लोकांची फसवणूक केल्याप्रकरणात आतापर्यंत पुणे पोलिसांनी ६४ लाख रुपयांचे ४५१ बिटकॉईन हस्तगत करण्यात यश आले आहे़ आतापर्यंत १० आरोपींना अटक केली असून, शिवाजीनगर न्यायालयात सायबर सेलने त्यांच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले़
बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यानंतर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो लोकांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात सायबर गुन्हे शाखेने अटक केलेल्या एका आरोपीच्या बिटकॉईन कॅश वॅलेटमधून ६४ लाख रुपये किमतीच्या ४५१ बिटकॉईन जप्त केल्या आहेत.
अमित भारद्वाज याने सिंगापूरमध्ये एप्रिल २०१४ मध्ये गेन बिटकॉईन (जीबी २१) या कंपनीच्या माध्यमातून क्लाऊड मायनिंग करून बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास चार महिन्यांत २०० टक्के नफा मिळेल असे आमिष दाखवले.
आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने भारद्वाज व त्याच्या साथीदारांविरुद्ध राज्यातील पहिला गुन्हा पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल केला होता. त्यापाठोपाठ निगडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. निशा चंदन रायसोनी (वय ४६, रा. पुणे-सातारा रस्ता) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर राज्यात पुण्यातील दत्तवाडी व निगडी व राज्यातील नांदेड येथे गुन्हा केला. त्यानंतर अमित भारद्वाज याच्यासह दहा जणांना सायबर गुन्हे शाखेने अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. साहील ओमप्रकाश बागला याच्याकडून हस्तगत केलेल्या डिजिटल साहित्याचे फॉरेन्सिक अॅनालिसीस केल्यावर ४५१़९९९ इतक्या बिटकॉईन त्याच्या कॅश वॅलेटमध्ये असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्या बिटकॉईन कॅश वॅलेट अॅड्रेसमधून फॉरेन्सिक आॅडिटरच्या मदतीने ६४ लाख रुपये किमतीच्या बिटकॉईन जप्त केल्या आहेत.
हाँगकॉँग, दुबईत पैसे गुंतवले
१ सायबर सेलने अमित भारद्वाज व इतरांना ४ हजार पानी दोषारोपपत्र दाखल केले होते़ या ४ हजार पानी दोषारोप पत्रात त्यांनी यातून मिळविलेला पैसा कसा परदेशात गुंतविला याची माहिती दिली.
२ बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केलेल्यांच्या पैशातून अमित भारद्वाज याने जगातील सर्वांत उंच असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीत फ्लॅट खरेदी करण्यासाठी ५ कोटी १० लाख रुपये गुंतविले असून, हॉँगकॉँगमध्येही आणि दुबईमध्येही मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपये गुंतविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़