शहरातील ‘मुन्नाभाईं’वर होईना पोलीस कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:10 AM2021-03-24T04:10:43+5:302021-03-24T04:10:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘पोलीस हमे अंदर नही कर सकी, तो बाहेर क्या निकालेगी’ हा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘पोलीस हमे अंदर नही कर सकी, तो बाहेर क्या निकालेगी’ हा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातील संवाद सर्वांना माहीत आहे. पण तशीच काहीशी परिस्थिती सध्या पुण्यात आहे. शहरातील ३६ बोगस डॉक्टरांविरोधात महापालिकेकडून पोलिसांकडे वारंवार तक्रार करण्यात आली आहे. परंतु, यात कारवाई न झाल्याने महापालिकेचा आरोग्य विभागही हतबल झाला आहे. अखेर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनीच पाेलिसांकडून सदर बोगस डॉक्टरांविरुद्ध झालेल्या कायदेशीर कारवाईची सविस्तर माहिती मागविली आहे.
शहरातील धनकवडी परिसरातील एका बोगस डॉक्टरबाबत तेथील विभागीय वैद्यकीय अधिका-यांकडून वारंवार तक्रार करण्यात आली. पण संबंधित डॉक्टरचा व्यवसाय खुलेआम सुरू असून, यु-ट्यूबवरही त्या मुन्नाभाईचे वैद्यकीय सल्ल्याबाबतचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हीच परिस्थिती शहरातील अन्य काही भागांमध्ये आहे. तसेच अनेक बोगस डॉक्टरांचे संपर्क क्रमांक विविध संकेतस्थळांवर आजही आहेत. यामुळे महापालिकेने सायबर सेलकडेही याबाबत तक्रार केली आहे. पण अद्याप कारवाई झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर बोगस डॉक्टरांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यांचा शोध घेण्यासाठी महापालिका क्षेत्रात राबविण्यात येणा-या शोध मोहीमअंतर्गत गठीत समितीची आढावा बैठक महापािलका आयुक्त विक्रम कुमार यांनी नुकतीच घेतली. या बैठकीला बोगस डॉक्टरांविरोधात वारंवार तक्रार करण्यात आलेल्या पोलीस स्टेशनच्या अधिका-यांनाही बोलविण्यात आले होते. परंतु त्या पोलीस स्टेशनमधील अधिका-यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. तर जे पोलीस अधिकारी उपस्थित होते त्यांनी महापालिकेने दाखल केलेल्या तक्रारीची माहिती घेऊ असे उत्तर दिले.
यामुळे महापालिका आयुक्त कुमार यांनी, महापालिकेने तक्रार केलेल्या बोगस डॉक्टरांविरुद्ध पाेलिसांनी काय कारवाई केली, त्यांना अटक झाली आहे का, आरोपपत्र दाखल केले आहे का, आदी कायदेशीर कारवाईची शहरस्तरावरील सविस्तर माहिती मागविली आहे. या बैठकीला सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत, मुख्य विधी सल्लागार अॅड. मंजूषा इधाटे व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
-----------------------
चौकट :-
महापािलकेने बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती गोळा केली आहे. यात ३ हजार ९३५ डॉक्टरांची माहिती गोळा झाली असून नव्याने वैद्यकीय व्यवसाय सुरू करणा-यांना आरोग्य विभागाला माहिती देणे बंधनकारक केले असल्याची माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली.
------------------------------------