अन् ‘तो’ फटाका पडला ४८ लाख रुपयांना! बुलेटस्वारांवर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 01:09 PM2022-10-31T13:09:28+5:302022-10-31T13:10:02+5:30
पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून धडाकेबाज कारवाई....
- नारायण बडगुजर
पिंपरी : ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, तरीही काही जणांकडून ध्वनी प्रदूषण केले जात आहे. यात कर्णकर्कश आवाज काढणारे सायलेन्सर बसविणाऱ्या बुलेटस्वारांची भर पडत आहे. अशा बुलेटस्वारांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून धडाकेबाज कारवाई केली जात आहे. यात यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या १० महिन्यांत ४ हजार ८४६ बुलेटस्वारांवर कारवाई करून ४८ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून सातत्याने दंडात्मक कारवाई केली जात आहे. यात बेशिस्त वाहनचालकांकडे कागदपत्रे तसेच त्यांच्या वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यासोबतच इ-चलानच्या माध्यमातून दंड आकारण्यात येत आहे. कानठळ्या बसविणारा आवाज काढण्यासाठी तसेच नागरिक व इतर वाहनचालकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी बुलेटस्वारांकडून सायलेन्सरमध्ये बदल केला जातो. परिणामी फटाक्यासारखा आवाज होऊन ध्वनी प्रदूषण होते.
रात्री वाजवले जातात ‘फटाके’
काही बेशिस्त बुलेटस्वार रात्री शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून रहिवासी भागातून बुलेट दामटतात. सायलेन्सरमधून फटाक्यांचा आवाज काढतात. शांतता क्षेत्रातही असे प्रकार सर्रास घडतात. यामुळे रहिवासी भागातील शांततेचा भंग होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
सांगवी विभागात सर्वाधिक कारवाई
पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांच्या १४ विभागांकडून जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या १० महिन्यांच्या कालावधीत बुलेटस्वारांवर ही कारवाई करण्यात आली. यात सांगवी वाहतूक विभागातर्फे सर्वाधिक कारवाई झाली. तसेच पिंपरी, चाकण आणि भोसरी या विभागांकडूनही मोठी कारवाई झाली.
‘त्या’ गॅरेजवाल्यांवर होणार गुन्हे दाखल
वाहनाच्या मूळ स्वरुपात बदल करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, तरीही बुलेटचे मूळ सायलेन्सर बदलून फटाक्यासारखा कर्णकर्कश आवाज काढणारे सायलेन्सर बसवून दिले जातात. शहरातील काही गॅरेजमध्ये असे सायलेन्सर बसवून दिले जातात. संबंधित गॅरेजवाल्यांनी सायलेन्सर बदलून देऊ नये, अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
बुलेटस्वारांनी तसेच इतर वाहनधारकांनी देखील वाहनाच्या मूळ स्वरुपात बदल करू नये. वाहतूक नियम तसेच कायद्याचे पालन केले पाहिजे. सायलेन्सर बदलून देणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल.
- आनंद भोईटे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड