अवैधरित्या चंदनाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई; २५ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 03:05 PM2020-12-01T15:05:25+5:302020-12-01T15:09:45+5:30
एका टेम्पोतून चंदनाच्या झाडाची लाकडे अवैधरित्या चालवली आहेत अशी पोलिसांना माहिती मिळाली होती.
शिक्रापूर : पुणे- नगर रोडवरील चाकण फाटा येथे पाठलाग करून पकडलेल्या टेम्पोतून चंदनाची छुपी तस्करी सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पंचवीस लाख ८३ हजार रुपयांच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे करण्यात आली. सूरज कैलास उबाळे (वय २४ रा.चांदा तालुका नेवासा, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना पुणे-नगर रस्त्यावर एका टेम्पो (एमएच-१७. बीडी. २६९८) मध्ये चंदनाच्या झाडाची लाकडे अवैधरित्या चालवली आहेत अशी खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकांना सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाने टेम्पोचा पाठलाग करत शिक्रापुर येथे चाकण चौकात आले असता त्याला थांबवले. त्यानंतर पोलिसांनी चालकाची कसून चौकशी केल्यानंतर त्याने प्रथम गाड़ी रिकामी असल्याचे सांगितले. मात्र पथकाने गाडीची पूर्ण झड़तीघेतल्यानंतर गोण्यांमध्ये १९०किलोग्राम वजनाची चंदनाच्या गाभ्याची लाकडे मिळून आली. आरोपी सूरज कैलास उबाळे (वय २४रा.चांदा तालुका नेवासा जिल्हा अहमद नगर) याला अटक केली.सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, अमोल गोरे,दत्तात्रय गिरमकर,मंगेश थिगळे,अक्षय नवले,प्रसन्नजीत घाडगे यांनी केली आहे.पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत .