वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची कारवाई सुरू
By admin | Published: November 22, 2014 12:12 AM2014-11-22T00:12:55+5:302014-11-22T00:12:55+5:30
बारामती शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी सम, विषम पार्किंग व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे.
बारामती : बारामती शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी सम, विषम पार्किंग व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरातील पथारी व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायासाठी ‘हॉकर्स झोन’ची अंमलबजावणी करण्यात येईल. दिवसभर नोकरीनिमित्त आलेल्या गाड्या एकाच जागेवर लावल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दुकान मालकांनी ठरवून दिलेल्या जागेवरच कर्मचाऱ्यांना गाड्या लावणे सक्तीचे करण्यात येणार आहे.
बारामती शहरातील वाहतूक नियंत्रणाबाबत ‘लोकमत’ने ‘पदपथ बनले व्यवसाय पथ’ असे वृत्त प्रसिद्ध केले. त्याचबरोबर शहरात ठिकठिकाणी रस्त्यालगत केलेल्या पदपथांचा वापरच होत नसल्याचे निदर्शनास आणले. ठिकठिकाणी झालेल्या अतिक्रमणाच्या अनुषंगाने वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर आजपासूनच बारामती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी स्वत: पोलीस व्हॅनमधून वाहतुकीला अडथळा करणाऱ्या गाड्यांवर स्पीकरद्वारे माहिती देऊन कारवाई सुरू केली. मुख्य बाजारपेठेत दुकानांमध्ये नोकरीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मालकांनी वाहनतळाची सोय केली आहे. याच अनुषंगाने आज तहसील कार्यालयाच्या सभागृहात वाहतूक नियंत्रणासाठी व्यापारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापार महासंघ, पथारी व्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वाहतूक सुधारणांसाठी अनेकांनी सुचना मांडल्या. बैठकीला नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, नायब तहसीलदार तांबोळी आदी उपस्थित होते. तीन हत्ती चौक ते पेन्सिल चौक पर्यंत प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांच्या वेगांवर मर्यादा आणणे, त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणे आदी निर्णय घेण्यात आल्या आहेत.
नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी सांगितले की, शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. अपघात टाळण्यासाठी दुभाजक तोडण्याची मागणी नगरसेवक सुनिल सस्ते यांनी केली. यावेळी किशोर सराफ, अॅड. नितिन भामे, नरेंद्र गुजराथी, अण्णा आटोळे, करण इंगुले, संतोष टाटीया, नवनाथ बल्लाळ, निलेश मोरे, आसिफ खान, जितेंद्र जाधव आदींनी सूचना मांडल्या. (प्रतिनिधी)