पोलिसांनी समजूत घालत पुन्हा जुळविल्या ‘त्यांच्या’ रेशीम लग्नगाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 02:55 PM2018-05-05T14:55:54+5:302018-05-05T14:55:54+5:30
नववधूने घेतलेल्या साडीवरून वाद झाला. यावरून मुलांकडच्यांनी टोकाची भूमिका घेत लग्न मोडत असल्याचे जाहीर केले.
गौरव कदम
पुणे : प्रेमाची गोड परिणिती लग्नात होत असताना नववधूच्या साडीवरून झालेल्या वादातून लग्न मोडण्याची वेळ आली होती. मात्र, पोलिसांनी समजूत घालत पुन्हा लग्नाच्या रेशीमगाठी जुळविल्याने हा विवाह सोहळा होऊ शकला.
सहकारनगर परिसरातील सविता आणि विकास (नावे बदलली आहेत) यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. प्रेमप्रकरण घरी सांगून लग्नास होकारही मिळविला. नातेबाईकांच्या उपस्थितीमध्ये साखरपुडा झाला. दोन्ही घरात लग्नाची धावपळ व शुभकार्याच्या वातावरणात खरेदीची धावपळ सुरू झाली. मंगलकार्यालय ठरविण्यात आले, पत्रिका वाटल्या. सोन्याचीही खरेदी झाली होती. मात्र, नववधूने घेतलेल्या साडीवरून वाद झाला. यावरून मुलांकडच्यांनी टोकाची भूमिका घेत लग्न मोडत असल्याचे जाहीर केले. आयुष्य भर साथ देण्याची वचने देणाऱ्या विकासनेही पाठ फिरवली. सविताचे पुढील आयुष्यच अंधारमय झाले.तिने न्याय मिळविण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली. लग्नाला दोन दिवस बाकी असताना निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य पोलिसांनी ओळखले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजुंची समजूत घातली. रागाच्या भरात करत असलेल्या चुकीची जाणीव विकासला करून दिली. विकासलाही चूक उमगल्याने सर्वाच्या साक्षीने लग्नगाठ जुळली गेली.