खळबळजनक! पुण्यात पोलिसानेच दिली पोलिसाला मारण्यासाठी गुन्हेगाराला सुपारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 06:23 PM2022-01-01T18:23:07+5:302022-01-01T18:24:38+5:30
पोलीस कर्मचाऱ्याला मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर
पुणे : पोलीस कर्मचाऱ्यानेच रेकॉर्डवरील गुन्हेगाराला दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी कट रचून खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एका गुन्हेगाराला अटक केली आहे.
योगेश प्रल्हाद अडसुळ (वय ३५, रा. काळेपडळ, एकता कॉलनी, हडपसर) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तर पोलीस अंमलदार नितीन दुधाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील बाळसो लोहार यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२१पासून आजपर्यंत हडपसर व दत्तवाडी परिसरात घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी नितीन दुधाळ हा सध्या फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तो आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी हे शेजारी शेजारी रहायला होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला होता. योगेश अडसुळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो नुकताच खूनाच्या गुन्ह्यातून पॅरोलवर सुटला होता. नितीन दुधाळ याने अडसुळ याची हडपसर येथे भेट घेतली. त्याला सुपारी देऊन पोलीस कर्मचारी यास मारहाण अथवा अपघात करुन गंभीर दुखापत करुन कायमचे अपंगत्व आणण्यासाठी व त्याचा जीव गेला तरी मी सर्व काही पाहीन, असे सांगितले. अडसुळ याने दत्तवाडी येथील एका गुन्हेगाराला या पोलीस कर्मचाऱ्याची सर्व माहिती काढण्यास सांगितले. तो जातो कोठे, कधी येतो, त्याच्याकडे काही हत्यार आहे, अशी माहिती काढण्यास सांगितले.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी सांगितले की, दत्तवाडी पोलिसांना अशा प्रकारे सुपारी दिल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या गुन्हेगाराला ताब्यात घेऊन माहिती घेतली. त्याला अडसुळ याने १० हजार रुपये दिल्याचेही या गुन्हेगाराने सांगितले. त्यानंतर दत्तवाडी पोलीस ठाण्यातील या पोलीस कर्मचार्याचा पाठलाग करुन त्याचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न कट रचल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी योगेश अडसुळ याला अटक केली आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस नितीन दुधाळ याचा शोध घेत आहे.