गुन्हेगार होताहेत पोलिसांवर शिरजोर
By admin | Published: December 28, 2016 04:30 AM2016-12-28T04:30:39+5:302016-12-28T04:30:39+5:30
पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना मुंबई आणि अन्य शहरात घडत असताना, पिंपरी-चिंचवडही त्यास अपवाद राहिले नाही. कधी वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याशी
पिंपरी : पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना मुंबई आणि अन्य शहरात घडत असताना, पिंपरी-चिंचवडही त्यास अपवाद राहिले नाही. कधी वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याशी हमरीतुमरीची भाषा केली जाते. तर संशयित म्हणून हटकल्याचा राग आल्यामुळे गस्तीवरील पोलिसांना चोप देण्याची घटना नुकतीच शहरात घडली आहे. आतापर्यंत कोठे तरी गल्लीत वाहनांच्या काचा फोडणे, नंग्या तलवारी घेऊन वावरणे असे नागरिकांमध्ये दहशत माजविण्याचे प्रकार घडले आहेत. आता तर गुन्हेगार थेट पोलिसांवरच चाल करू लागल्यामुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वाहतुकीला अडथळा ठरेल, अशा पद्धतीने रस्त्यात थांबून बांगड्या विक्री करणाऱ्या महिलेला दुसऱ्या ठिकाणी बसण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने चिडलेल्या महिलेने वाहतूक नियमनासाठी थांबलेल्या पोलीस कर्मचारी महिलेस शिवीगाळ केली. एवढेच नव्हे, तर धक्काबुक्कीसुद्धा केली. महिलेविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. हिंजवडी वाहतूक विभागात हवालदार पदावर कार्यरत असलेल्या लता अंबरगी यांना मागील आठवड्यात कटू अनुभवांना सामोरे जावे लागले. वाहतुकीस अडथळा होईल, अशा स्थितीत बांगड्या विक्री करण्यास थांबलेल्या महिलेस हटकले. त्याचा राग आल्याने हवालदार
लता अंबरगी यांना त्या महिलेने
अपशब्द वापरले. एवढेच नव्हे, तर बघून घेण्याची धमकीही दिली. पोलिसांशी बोलताना तरी तारतम्य बाळगावे, एवढेही भान राखले जात नाही.(प्रतिनिधी)
- संशयास्पदरीत्या थांबलेल्या सराईत गुन्हेगाराला गस्तीवरील पोलिसांनी हटकले. चिडून त्याने पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, हाताला चावा घेऊन पोलिसाला जखमी केल्याची घटना आकुर्डी येथे घडली. दया मुन्ना ऊर्फ सुनील यलाप्पा शिवपुरे (रा. सोलापूर) असे त्या आरोपीचे नाव आहे.
- पोलीस नाईक अमोल पिसे, पोलीस शिपाई धादवड हे गुंडाने केलेल्या हल्ल्यात जखमी झाले. गस्त घालत असताना पोलीस नाईक पिसे आणि धादवड यांना आरोपी दया हा संशयास्पदरीत्या थांबलेला दिसला. त्याला त्यांनी हटकले. तो पळून जाऊ लागला. त्या वेळी पोलीस पाठलाग करू लागले. मागे वळून त्याने पोलीस नाईक पिसे यांच्यावर कोयत्याने वार केले. प्रतिकार करत त्याचे हात धरण्याचा प्रयत्न करताना, आरोपी दया याने पोलिसांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच पिसे यांच्या हाताला जोरात चावा घेतला. पोलीस शिपाई धादवड यांनाही खिळे असलेल्या बांबूने मारहाण केली.