हडपसर पोलीस करताहेत पहारा देण्याचे काम
By Admin | Published: May 14, 2016 12:27 AM2016-05-14T00:27:05+5:302016-05-14T00:27:05+5:30
शेवाळवाडी (ता. हवेली) येथे पुणे-सोलापूर महामार्गावर महसूल विभागाने अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणाऱ्या चौदा ट्रकवर कारवाई करून दोन दिवसांचा कालावधी झाला
लोणी काळभोर : शेवाळवाडी (ता. हवेली) येथे पुणे-सोलापूर महामार्गावर महसूल विभागाने अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणाऱ्या चौदा ट्रकवर कारवाई करून दोन दिवसांचा कालावधी झाला, तरी आजअखेर दंडाची रक्कम भरण्यासाठी तहसील कार्यालयात कोणीही फिरकले नसल्याने या वाहनांना पहारा
देण्याचे काम हडपसर पोलिसांना करावे लागत आहे.
कारवाईत पकडण्यात आलेली सहा वाहने सिद्धेश्वर पेट्रोलपंपाच्या आवारामध्ये उभी असून, अन्य आठ वाहने रस्त्याच्या कडेला सोडून वाहनचालक फरार झाल्याने संबंधित वाहनांच्या चाकातील हवा सोडून दिली आहे. त्यामुळे वाहनचालक त्वरित रितसर महसूल कायद्यानुसार दंड भरतील, अशी अपेक्षा होती. मात्र, कोणताही वाहनचालक अथवा मालक हवेली तहसीलदार कार्यालयात फिरकलेच नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आदेशान्वये हवेली तालुक्याचे तहसीलदार दशरथ काळे, निवासी नायब तहसीलदार सुनील शेळके, थेऊरचे मंडल अधिकारी हरिदास चाटे, लोणी काळभोर येथील तलाठी विष्णू चिकने, हडपसरचे तलाठी शिवाजी देशमुख, लोहगावचे तलाठी हिंदूराव पोळ, वारजे माळवाडी येथील तलाठी विकास फुके,महंमदवाडीचे तलाठी दिलीप पलांडे, मांजरी बुद्रुक येथील तलाठी मिलिंद सेठी, खराडी येथील तलाठी गणेश सुतार, खेड शिवापूर येथील तलाठी प्रकाश महाडिक, कोतवाल नामदेव शिंदे, हवेली तहसील कार्यालयातील कारकून सचिन पवार, रोहन देवरे इत्यादीनी महसूलच्या पथकात भाग घेऊन चौदा वाहनांवर धडक कारवाई केली आहे.
महसूल विभागाच्या कारवाईनंतर पुन्हा या परिसरात अनधिकृत वाळूची वाहने ये-जा करू लागली आहेत. रस्त्याच्या कडेला पहाटे सकाळी लवकर व रात्री उशिरा याठिकाणी वाळू वाहतूकदारांनी आपला थांबा याठिकाणी बनवला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूला खरेदीदार मिळत असल्याने वाळू वाहनांची सतत येथे वर्दळ असते. ( वार्ताहर )