..अखेर अफलातून कल्पना लढवून सराफांना गंडा घालणारी महिला ताब्यात; ६ लाखांच्या १२ अंगठ्या जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 09:37 PM2021-12-02T21:37:52+5:302021-12-03T19:18:29+5:30
सराफ दुकानात अंगठी खरेदीच्या बहाण्याने येऊन अस्सल अंगठीच्या जागी तशीच बनावट अंगठी ठेवून अंगठ्या चोरणाऱ्या एका महिलेमुळे पोलीस गेले काही दिवस हैराण झाले होते
पुणे/हडपसर : सराफ दुकानात अंगठी खरेदीच्या बहाण्याने येऊन अस्सल अंगठीच्या जागी तशीच बनावट अंगठी ठेवून अंगठ्या चोरणाऱ्या एका महिलेमुळे पोलीस गेले काही दिवस हैराण झाले होते. या महिलेला पकडण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. शहरातील अशा १२ चोरीच्या घटना उघडकीस आल्या असून तिच्याकडून ६ लाख २३ हजार रुपयांच्या १२ सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. हडपसर-बिबवेवाडी दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासून महिलेचा शोध पोलिसांनी घेतला.
पूनम परमेश्वर देवकर (वय ४२, रा. बिबवेवाडी, पुणे) असे तिचे नाव आहे. हिने हडपसर, कोथरुड, रविवार पेठ, चाकण, चिंचवड, भोसरी, सहकारनगर येथील चंदुकाका सराफ, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स, रांका ज्वेलर्स, मलबार ब्ल्यु स्टोन अशा नामांकित सराफ दुकानात तिने चोऱ्या केल्या आहेत.
या महिलेने पुणे शहरातील इतर दुकानात केलेल्या गुन्हे केल्याची माहिती सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मिळाली. ते सर्वत्र पाठविण्यात आले होते. हडपसर पोलीस ठाण्यातील महिला अंमलदार प्रदीप सोनवणे आणि प्रशांत दुधाळ यांना मिळालेल्या माहितीवरुन खात्री केली असता ही महिला सराफी दुकानांसमोरुन मॉलकडे जात होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे अधिक तपास केला असता तिने चोरीची कबुली दिली.
सराफ दुकानात होती सेल्समन
पूनम देवकर ही २००५ - ०६ मध्ये लक्ष्मी रोडवरील एका दुकानात सेल्समन म्हणून कामाला होती. तेथे काम करीत असताना चोरी केल्याने तिच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सराफी दुकानातील कामाचा अनुभव असल्याने सोन्याचे दागिन्यावर स्टीकर कसे लावायचे याबाबत तिला माहिती होती. त्याचा गैरफायदा घेत तिने सोन्याच्या अंगठ्या चोरल्याचे उघड झाले आहे.
अशी करायची हातचलाखी
दुकानात गेल्यावर ती सोन्याचे अंगठ्या पाहण्याचा बहाणा करीत. त्यादरम्यान कधी पाणी व चहाची मागणी करुन सेल्समनचे लक्ष विचलित करीत असे. आणखी सोन्याच्या अंगठ्या दाखविण्यास सांगून मुळ सोन्याची अंगठी तिचे डाव्या हातातील मोबाईलचे खाली लपवून त्यासारखीच दिसणारी बनावट सोन्याची अंगठी त्यावर यापूर्वीचे ठिकाणाहून चोरुन आणलेले सोन्याचे अंगठीचे लेबल लावून ती बनावट अंगठी सोन्याचे अंगठीचे ट्रे मध्ये ठेवून देत असत. ट्रे मध्ये असलेल्या अंगठ्या सर्व जागेवर दिसत असल्याने तिची ही चोरी लवकर समजून येत नसे. काही दिवस गेल्यानंतर दागिन्यांची पाहणी करीत असताना घडलेला प्रकार सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उघडकीस आल्यावर फसवणूक केल्याचे सराफांच्या लक्षात येत असे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, दिगंबर शिंदे राजू अडागळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.