रिक्षावरच्या 313 क्रमांकावरुन पाेलिसांनी लावला आराेपींचा शाेध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 08:25 PM2019-02-11T20:25:06+5:302019-02-11T20:26:07+5:30
रिक्षाने येऊन घरफाेडी करणाऱ्या आराेपींना पाेलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 लाख 64 हजार 750 रुपयांच्या घरफाेडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
पुणे : रिक्षाने येऊन घरफाेडी करणाऱ्या आराेपींना पाेलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 लाख 64 हजार 750 रुपयांच्या घरफाेडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. यातील 4 लाख 68 हजार 250 रुपयांचे साेन्याचे व चांदीचे दागिने पाेलिसांनी हस्तगत केले आहे. आराेपी गुन्ह्यासाठी वापरत असलेल्या रिक्षाच्या पुढील बाजूस हिरव्या रंगात लिहीलेल्या 313 या क्रमांकावरुन पाेलिसांनी आराेपींना शाेधून काढत अटक केली आहे. त्याचबराेबर या आराेपींकडे चाैकशी करुन विमानाने प्रवास करुन पुण्यात येऊन चाेरी करणाऱ्या टाेळीलाही जेरबंद करण्यात पाेलिसांना यश आले आहे.
नरेश पुरुषाेत्तमलाल मल्हाेत्रा (वय 61, रा. कुबेरा पार्क साेसायटी, काेंढवा खु.) आणि शक्ती शिवाजी ननवरे (वय 35 रा, महंमदवाडी) यांनी 15 जानेवारी राेजी हडपसर पाेलीस स्टेशनमध्ये घरफाेडी झाल्याची तक्रार नाेंदवली हाेती. याच दिवशी वाकड आणि निगडी पाेलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घरफाेडीचे गुन्हे दाखल झाले हाेते. या गुन्ह्यांचा तपास करताना पाेलिसांना आराेपी ताेंडाला रुमाल बांधून घरफाेडी करत असल्याची माहिती मिळाली हाेती. आराेपी एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी कुठल्या वाहनातून जातात याचा तपास करण्यासाठी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता आराेपी रिक्षातून जात असल्याचे समाेर आले हाेते. रिक्षाचा क्रमांक स्पष्ट दिसत नसला तरी रिक्षाच्या समाेरील बाजूस हिरव्या रंगात लिहीण्यात आलेला 313 क्रमांक व्यवस्थित दिसत हाेता. या क्रमांकावरुन पाेलिसांनी शाेध घेतला असता ही रिक्षा वाहीद खुर्शिद मन्सुरी (वय 33, रा. निगडी मुळ रा. उत्तरप्रदेश) चालवत असल्याचे समाेर आले. त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता, आराेपीने त्याच्या तीन साथिदारांसाेबत घरफाेडी केल्याचे कबुल केले. पाेलिसांनी ताब्यात घेतलेल्या आराेपीच्या मदतीने निगडी येथे राहण्यास असलेला त्याचा साथिदार रियासत रियाजुद्दीन मन्सुरी (वय 28) याला अटक केली. त्याच्या मदतीने अजमेर राजस्थान येथे राहणारा त्याचा साथिदार रिजवान निजामुद्दीन शेख (वय 25 रा. राजस्थान) याला राजस्थान येथून ताब्यात घेण्यात आले.
तसेच या दाेन्ही आराेपींच्या मदतीने चाैथा आराेपी फैसल जुल्फीकार अन्सारी (वय 22) याला बिजनाेर उत्तरप्रदेश येथून अटक करण्यात आली. आराेपींनी एकूण चार घरफाेडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या सर्व आराेपींच्या मदतीने विमानाने पुण्यात येऊन चाेरी करणाऱ्या माेहम्मद सलमान झुल्फकार अन्सारी उर्फ सलमान अन्सारी (वय 27), नफासत वहीद अन्सारी (वय 29, सर्व रा, उत्तरप्रदेश) यांना त्यांचा पुण्यातील साथीदार रिक्षाचालक मुशरफ यामीन कुरेशी (वय 35 रा. निगडी) याच्या मदतीने पुणे विमानतळ येथे अटक करण्यात आली.