स्मार्ट सिटी योजनेतील सायकल चोरणाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 08:31 PM2018-11-10T20:31:59+5:302018-11-10T20:33:05+5:30
स्मार्ट सिटी योजनेतील एक सायकल चोरीची फिर्याद मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी ते गांभीर्याने घेऊन सायकलचोरला पकडले. त्याच्याकडून सायकलही जप्त केली आहे.
पुणे : पुणे शहरातून दररोज साधारण ८ ते १० वाहने चोरीला जातात़ त्यामध्ये दुचाकींबरोबरच चारचाकींचाही समावेश असतो़. वाहन चोरी रोखण्यामध्ये पोलिसांना यश येत नसले तरी त्याबाबत पोलीस फारसे गंभीर नसतात. पण, स्मार्ट सिटी योजनेतील एक सायकल चोरीची फिर्याद मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी ते गांभीर्याने घेऊन सायकलचोरला पकडले. त्याच्याकडून सायकलही जप्त केली आहे.
महादेव विजयकुमार मुनळे (वय १९, रा. कृष्णानगर, महम्मदवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत सायकल पुरवठा करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक आदर्श केदारी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात २५०० सायकली उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या सायकलींना जीपीएस यंत्रणा लावण्यात आली आहे. सायकल वापरणाऱ्यांकडून प्रतिमहा ९९ रुपये भाडे आकारण्यात येते. शहरातील मध्यभागातून एक सायकल चोरीला गेली होती. याबाबतची तक्रार कोंढवा पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. जीपीएस यंत्रणा तसेच कंपनीकडे नोंद असलेल्या मोबाईल क्रमांकावरुन मुनळे याचा पोलिसांकडून माग काढण्यात आला. मुनळेला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक सायकल जप्त करण्यात आली आहेत.
पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहाय्यक आयुक्त मिलींद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, उपनिरीक्षक संतोष शिंदे, हवालदार राजस शेख, शिंदे, अमित साळुंके, पृथ्वीराज पांडुळे, योगेश कुंभार, अजीम शेख आदींनी ही कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी कोंढवा भागात झालेल्या घरफोडीच्या गुन्हयातील आरोपी रिजवान नईम मेमन (वय १९, रा. सुंदर विहार सोसायटी, मिठानगर, कोंढवा खुर्द) याला ताब्यात घेतले. अटकेत असलेल्या मेमनने घरफोडीचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून ५९ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.