येरवडा येथील पोल्ट्री फार्मवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 07:46 PM2020-09-15T19:46:10+5:302020-09-15T19:48:57+5:30
पोल्ट्री फार्म बंद झाल्यावर त्याच्या कॅश काऊंटरवर दरोडा टाकण्याचा होता प्लॅन..
पुणे : येरवडा येथील पोल्ट्री फार्म, चिकन सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने पकडले. रिक्षाचालकाला भाडे असल्याचे भासवून त्याला निर्जन स्थळी देऊन लुटण्याचा प्रकार या तिघांनी केल्याचे उघडकीस आले आहे.
दिलीप विठ्ठल भोई (वय २८, रा. फिरस्ता, मुळगाव जामनेर, जि. जळगाव), राज्या ऊर्फ विकास सिताराम लांडगे (वय ३५, रा. फिरस्ता, मुळगाव बोरीवली, मुंबई) आणि विकास दिलीप कांबळे (वय २५, रा़ अपर इंदिरानगर, मुळगाव सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे सहायक फौजदार अब्दुल करीम सय्यद व पोलीस नाईक सुरेंद्र साबळे हे यांना येरवडा येथील संगमवाडीकडे जाणाऱ्यया चौकात ४ जण संशयास्पदरित्या थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी तेथे जाऊन त्यांना पकडले. त्यांच्या झडतीत २ कोयते, १ चाकू व नायलॉनची दोरी असा माल आढळून आला. अधिक चौकशीत त्यांनी सादलबाबा दर्ग्याजवह योजना पोल्ट्री फार्मला रविवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे पोल्ट्री फार्म बंद झाल्यावर त्याच्या कॅश काऊंटरवर दरोडा टाकण्याचा बेत होता, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी चौघांनाही अटक केली असून न्यायालयाने त्यांना १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
रिक्षाचालकांना देखील लुबाडल्याचे उघडकीस..
या टोळीने भाडे असल्याचे सांगून रिक्षाचालकांना लुबाडल्याचे उघडकीस आले आहे. दापोडी येथील एका रिक्षाचालकाला चऱ्होली येथे नेऊन त्याच्याकडील मोबाईल चोरल्याचे आढळून आले आहे.तसेच येरवडा येथील रिक्षाचालकाला भावाचा अपघात झाला असून उरळी कांचनला जायचे असल्याचे सांगून वाटेत त्याच्या गळ्याला चाकू लावून त्यांच्याकडील मोबाईल व ७ हजार रुपये असा ऐवज या टोळीने लुबाडल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपींची मोडस ऑपरेंडी
आरोपी हे रिक्षाचालकांना निर्जनस्थळी नेऊन त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडील मोबाईलवरुन त्यांच्या नातेवाईकांना फोन करुन रिक्षाचालकाचा अपघात झाला आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. एवढे एवढे पैसे घेऊन या, असे सांगून एका ठिकाणी बोलवितात व पुन्हा त्यांच्याकडील पैसे लुटून नेतात. तसेच पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेरील निर्जन रोडवर रेल्वेने आलेल्या प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून मारहाण करुन त्याच्याकडील मोबाईल व रोख रक्कम लुबाडत. अंधारात रेल्वे थांबल्यानंतर खिडकीत कोण मोबाईलवर बोलत असल्याचे पाहून रेल्वे सुरु होताच काठीने मोबाईल पाडतात. त्यानंतर ते हे मोबाईल एखाद्या गरजुला कमी किंमतीत विकून आलेल्या पैशातून नशा पाणी करीत असल्याचे तपासात आढळून आले आहे.
अशा प्रकारे कोणाला लुटले असल्यास त्यांनी गुन्हे शाखेच्या युनिट ४ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय झंजाड, सहायक फौजदार अब्दुल करीम सय्यद, भालचंद्र बोरकर, गणेश साळुंके, शितल शिंदे, सुरेंद्र साबळे, राकेश खुणवे, निलेश शिवतरे व सुहास कदम यांनी केली आहे.